उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प-५ येथील गेमनानी कंपाउंड परिसरात कापडाच्या चिंध्या साठवून ठेवलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या उंचच उंच ज्वाळा आणि आकाशात पसरलेल्या काळ्या धुराच्या लोटांमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. गोदामात मोठ्या प्रमाणात कापडाच्या चिंध्या साठवून ठेवण्यात आल्याने आग अधिक भडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे आग इतर ठिकाणी पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत गोदामातील किती मालाचे नुकसान झाले, याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतरच नुकसानीचा नेमका अंदाज स्पष्ट होणार आहे.