ठाणे

Ulhasnagar Fire : उल्हासनगरातील सात मजली 'आशा लोक' इमारतीला भीषण आग, ८ दुचाकी जळून खाक

सात मजली या इमारतीत एकूण 49 फ्लॅट धारक वास्तव्यास असून धुरामुळे अनेक नागरिक वरच्या मजल्यांवर अडकून पडले

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौक दरम्यान असलेल्या सात मजली आशा लोक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आठ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच वीज मीटर, विद्युत वायरिंग आणि पार्किंगमधील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तळ मजल्यावरील मीटर बॉक्समध्ये लागलेल्या आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण इमारतीत दाट धुराचे साम्राज्य पसरले आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सात मजली या इमारतीत एकूण 49 फ्लॅट धारक वास्तव्यास असून धुरामुळे अनेक नागरिक वरच्या मजल्यांवर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिड्यांच्या साहाय्याने तसेच काही नागरिकांना खांद्यावर उचलून सुरक्षित बाहेर काढले. जवानांच्या या धाडसी आणि तत्पर बचावकार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

कठोर प्रयत्नांनंतर अग्निशमन विभागाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत पार्किंगमधील आठ दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच सर्व वीज मीटर, अंतर्गत विद्युत वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लिफ्ट सेवा बंद असून पाण्याच्या मोटारीही कार्यरत नसल्याने रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT