Fake Branded Jeans Factory Raid Pudhari
ठाणे

Fake Branded Jeans Factory Raid: उल्हासनगरमध्ये बनावट ब्रँडेड जीन्स कारखान्यावर छापा; लाखोंचा माल जप्त

नेत्रिका इन्व्हेस्टिगेशन टीम व हिल लाईन पोलिसांची संयुक्त कारवाई; कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 5 येथील आकाश कॉलनीत असलेल्या एका जीन्स कारखान्यावर मोठी कारवाई करत नेत्रिका इन्व्हेस्टिगेशन टीमने हिल लाईन पोलीस ठाण्याच्या मदतीने छापा टाकून लाखो रुपयांच्या नामांकित ब्रँडच्या नावाने तयार केलेल्या बनावट ट्राउजर पँट जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेत्रिका इन्व्हेस्टिगेशन टीमचे सदस्य रामजीत गुप्ता, रवी वासवानी, विजय पवार, धीरू पटेल, विनोद सुमरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आकाश कॉलनीतील एका जीन्स उत्पादन कारखान्यावर छापा टाकला. तपासादरम्यान त्या ठिकाणी ब्रँडचे लेबल लावून मोठ्या प्रमाणात बनावट ट्राउजर पँट तयार केल्या जात असल्याचे आढळून आले.

जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे. संबंधित आरोपीकडे या नामांकित ब्रँडचे उत्पादन किंवा विक्री करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. टीमने घटनास्थळी तयार माल जप्त करून प्रकरणाची माहिती हिल लाईन पोलीस ठाण्याला दिली. या प्रकरणी पवन गुप्ता या व्यक्तीविरोधात कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पुढील तपास हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, हा बनावट माल नेमका कुठे-कुठे पुरवला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी सुरू आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाने सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसाय विरोधातील ही कारवाई मोठे यश मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT