उल्हासनगर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना बालकनजी बारी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात शंकर रतन कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दीपक फतपुरे हा त्याचे मित्र शंकर कांबळे आणि दिनेश अहिरे यांच्यासोबत गरीबनगर परिसरात उभा होता. यावेळी आदित्य गायकवाड, ऋषिकेश आरके, सुमित सुरडकर आणि त्यांच्यासोबत असलेले चार ते पाच अनोळखी तरुण तेथे आले. नेहरू चौकात यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत हाताने व ठोशाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आदित्य गायकवाड याने स्वतःजवळील चाकू काढून शंकर कांबळे याच्या पोटाच्या उजव्या बाजूला वार केला. या हल्ल्यात शंकर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी शंकरवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमित कैलास सुरडकर याला अटक केली असून, आदित्य गायकवाड, ऋषिकेश आरके यांच्यासह अन्य चार ते पाच आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खंदारे करीत आहेत. अटक आरोपी सुमित सुरडकर याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.