उल्हासनगर : प्रेमसंबंधाच्या कारणावरून २० वर्षीय तरुणावर लाकडी बांबू, लोखंडी रॉड व चप्पलने बेदम मारहाण केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.
अंबरनाथ पूर्व मधील गायकवाड पाडा येथे राहणारा विजय रामजिवन सुमन हा तरुण डिलिव्हरी बॉयचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सायंकाळी 7 वाजता फिर्यादीला बोलावून घेत एका मुली सोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर सुशांत उर्फ गोट्या, मुलीचा भाऊ आणि इतर साथीदारांनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीवर हल्ला केला. यावेळी मुलीच्या भावाने लाकडी बांबूने दोन्ही हातांवर मारहाण केली. सुशांतने लोखंडी रॉडने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली, तर इतर आरोपींनी बांबूने छाती, पोट आणि पायावर मारहाण केली. तसेच ‘संबधीत’ मुलीने चप्पल व लाकडी बांबूने मारहाण करून कमरेवर दुखापत केली.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब कोबरने, पोलिस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, किशोर काळे आणि प्रशांत धुडे यांच्या पथकाने सापळा रचून फॉरवर्ड लाईन परिसरातून सुशांत म्हस्के, ओम राजपूत, सुमित वैद आणि यश सोनावणे यांना अटक केली आहे. पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.