ठाणे

Ulhasnagar Crime : महिलेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा लूट, २४ तासांत आरोपीला बेड्या

हिललाईन पोलिसांची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

​उल्हासनगर : अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेन गावात एक धक्कादायक घटना घडली असून, रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून चोरट्यांनी त्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले. मात्र हिललाईन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या 24 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी विठा पाटील या काही कामानिमित्त जुनी पाण्याची टाकी परिसरातून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवून अचानक त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 6 तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. विठा पाटील यांनी डोळ्यांत जळजळ होत असतानाही चोरट्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे चोरट्यांच्या हाती पूर्ण मंगळसूत्र लागले नाही. मात्र तरीही ३ तोळे सोन्याचा भाग हिसकावून चोरटे फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक पोलीस पाटलांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश पाटील याला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात सामील असलेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी संग्राम मालकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT