उल्हासनगर : मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प ३ परिसरात घडली आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून महिलेचे केस कापले, गळ्यात चपलांचा हार घातला आणि भर रस्त्यात तिची धिंड काढली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीमती कांता प्रेम राजपूत (५०) या आपली बहीण गीता आणि मुलगी अंजली यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होत्या. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कॅम्प ३ येथील हडकमाता चौक परिसरातील गल्लीत आरोपींनी त्यांना अडवले. 'आमच्याविरुद्ध तक्रार का दिली?' असा जाब विचारत आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी नितीन थोरात याने कांता यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
संतापलेल्या आरोपींनी पीडित महिलेचे केस कापले आणि गळ्यात चपलांचा हार घालून परिसरात त्यांची धिंड काढली. यावेळी वाचवायला आलेल्या फिर्यादीची बहीण आणि मुलीलाही आरोपींनी जखमी केले. "पोलिसांकडे तक्रार केली तर बघून घेऊ," अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी ज्युली वाघरी, विणू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बाळू वाघरी, महेश वाघरी आणि इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी ज्युली वाघरी आणि विणू वाघरी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.