ठाणे

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये कैद्याचा थरार! रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी स्वतःच्याच डोक्याने फोडली काच

रुग्णालयात गोंधळ आणि तोडफोड

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात एका कैद्याने उपचारासाठी दाखल करून घेण्याच्या हट्टापायी चांगलाच राडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधारवाडी कारागृहातील मोका अंतर्गत अटकेत असलेल्या एका आरोपीने रुग्णालयातील केबिनची काच स्वतःच्या डोक्याने फोडून स्वतःला जखमी करून घेतले. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय घडले?

आबिद इस्तियाक अन्सारी असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा भिवंडीचा रहिवासी आहे. कोनगाव पोलिसांनी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केल्याने तो २०२३ पासून आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्याने कारागृह पोलिसांनी त्याला सायंकाळच्या सुमारास उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणले होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी केली आणि त्याला औषधोपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. डॉक्टरांनी त्याला पुन्हा कारागृहात नेण्यास सांगितल्याने आबिद संतापला.

रुग्णालयात गोंधळ आणि तोडफोड

कारागृहात परत जाण्याची इच्छा नसल्याने चिडलेल्या या आरोपीने चक्क रुग्णालयातील १३ नंबर कॅबिनच्या काचेवर आपले डोके जोरात आपटले. यात काच फुटून तो किरकोळ जखमी झाला. "आता तरी मला रुग्णालयात ऍडमिट करा" असा हट्ट धरत त्याने रुग्णालय परिसरात मोठा गोंधळ घातला. अचानक घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे तिथे उपस्थित रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते.

पोलीस कारवाई

पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. एका सराईत गुन्हेगाराने रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी केलेल्या या कृत्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT