उल्हासनगर: गणेश विसर्जनानंतर उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये संतोषनगर येथील शिवसेना शाखेजवळ साईनाथ मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यातील मुख्य आरोपी आमल्या उर्फ अमोल सावंत सह त्याच्या दोन साथीदारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी उज्जैन वरून परतताना धावत्या अवंतिका एक्सप्रेस मधून ताब्यात घेतले आहे.
यश प्रमोद पांडे हा मित्र हर्ष गायकवाड आणि सोनू करोसीया यांच्यासह गणेश वीसर्जन करून परतत होता. त्याचवेळी मागून आलेले राहुल ठाकुर उर्फ बाबू, तुषार गोडांबे उर्फ गोट्या, आमल्या सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी वाद उकरून काढला. सुरुवातीला किरकोळ शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा मित्र सनी कढरे याच्यासोबतच्या जुन्या वादातून चॉपर आणि काठ्यांनी हल्ला करत खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हर्ष गायकवाड गंभीर जखमी झाले होते.
या प्रकरणी यश प्रमोद पांडे यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी तुषार गोडांबे याला अटक केली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फरार आरोपी अमोल सावंत, राहुल ठाकूर आणि करण राजू वंश यांचा गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी.आर. दराडे, पोलिस कर्मचारी रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे यांच्या पथकाला उज्जैन वरून अवंतिका एक्सप्रेसने आरोपी येत असल्याची माहिती मिळाली होती.
त्या आधारे बोरीवली येथे सापळा रचत एक्सप्रेस पकडली. पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल येण्या आधी अमोल पांडुरंग सावंत, राहुल किशोर ठाकूर, करण राजू वंश यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.