ठाणे

Ulhasnagar Firing Case : कैलास कॉलनीतील गोळीबार प्रकरणी 2 मुख्य आरोपींना अटक

गोळीबारात सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला होता

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलास कॉलनी परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेखर बिराजदार आणि अजय राव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेंद्र उर्फ पिंट्या थोरवे यांना हत्याकांडातील काही आरोपी वांगणी परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस अंमलदार पिंट्या थोरवे, गणेश गावडे, रितेश वंजारी, योगेश वाघ, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, शेखर भावेकर आणि बाबू जाधव यांच्या पथकाने वांगणी परिसरात सापळा रचला. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास शेखर बिराजदार आणि अजय राव यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. दोघांकडून या प्रकरणाबाबत सखोल चौकशी सुरू असून, इतर फरार आरोपींचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॅम्प ५ मधील कैलास कॉलनी चौकात सायंकाळी साडेसातच्या सुमारास १५ ते १६ जणांच्या टोळक्याने हातात घातक शस्त्रे घेऊन हल्ला चढवला होता. या हल्ल्यात झालेल्या गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अर्जुन सुरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला आहे.

या दुहेरी हत्याकांडानंतर उल्हासनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. आता दोन मुख्य आरोपी अटकेत आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT