उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प 5 येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून सातत्याने मोठी कारवाई सुरू आहे. या प्रकरणी चार आरोपी हे पोलिस कोठडीत आहेत. आज बंदूक पुरवणाऱ्यासह आणखीन चार आरोपींना अटक करण्यात आल्याने अटक आरोपी संख्या आठ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता. घटनेनंतर कैलाश कॉलनीसह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले. सर्वप्रथम गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाइन पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली. सागर पाटीलच्या अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला.
दरम्यान, पुढील तपासात या हत्याकांडात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्याआधारे पोलिसांनी २६ मे रोजी बद्रुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली. प्रणय निकम याच्यावर हल्लेखोरांना बंदूक पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या दुहेरी हत्याकांडात सहभागी इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू असून तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींची चौकशी यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचे काम पोलीस करत आहेत.