ठाणे

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात नशेखोर तरुणाचा धुमाकूळ; रिक्षाचालक आणि कामगारावर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसरात पुन्हा एकदा एका नशेखोर तरुणाच्या धुमाकुळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नशेत धुंद असलेल्या या तरुणाने सायंकाळच्या सुमारास एका रिक्षाचालकावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याने पुढे जात एका कामगारावरही हल्ला केला, ज्यामध्ये कामगाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरातून एक रिक्षाचालक रिक्षा घेऊन जात असताना समोरून आलेल्या या नशेखोर तरुणाने कोणतेही कारण नसताना त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच रिक्षाची पुढची काचही फुटली. एवढ्यावरच न थांबता या आरोपीने पुढे जात एका कामगारालाही बेदम मारहाण केली.

या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. हा तरुण समोर येईल त्याच्यावर हल्ला करत असल्याचे पाहून संतप्त रिक्षाचालकांनी आणि नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला व मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर संतप्त रिक्षाचालकांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, जखमी रिक्षाचालक आणि संबंधित नशेखोर तरुण या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर दोघांपैकी कोणीही पोलिसांत फिर्याद देण्यासाठी आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच संबंधित तरुण अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा नशेखोर तरुणांचा वाढता वावर आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि रिक्षाचालकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT