फाईल फोटो 
ठाणे

Ulhasnagar Crime : उल्हासनगरमध्ये ९ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त, तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : उल्हासनगर परिसरात सुरू असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ९ लाख ३५ हजार रुपयांचा गांजा, रिक्षा आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प १ येथील अमरडाय कंपनीबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग, घरफोडी व वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी संशय आल्याने MH-05-CP-5555 क्रमांकाची रिक्षा अडवून तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान रिक्षामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

या प्रकरणी पोलिसांनी हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख (वय ५१, रा. अंबरनाथ पश्चिम), बिकास बिकरम रणबैसा (वय २६, रा. उडीसा) आणि सुधीर धरूबा रणबैसा (वय २७, रा. उडीसा) या तिघांना ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून सुमारे २१ किलो ५८४ ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ८ लाख ६३ हजार ३६० रुपये इतकी आहे. तसेच गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रिक्षा, तीन मोबाईल फोन असा एकूण ९ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान हा गांजा उडीसा येथून आणण्यात आल्याचे समोर आले असून तो अंबरनाथ परिसरातील बाबू खान नावाच्या व्यक्तीस विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT