नेवाळी : कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात कोयता गँगच्या उल्हासनगर गुन्हे शाखेने पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. बदलापुरातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपी चक्कीनाका परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला लागली होती. पोलीस उप निरीक्षक प्रवीण खोचरे यांच्या पथकाने सापळा रचून चक्कीनाका परिसरात चारचाकीचा पाठलाग करून दोघांना अटक केली आहे.
बदलापुरातील कुणाल गायकवाड आणि खडवलीतील अशपाक खान या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातील शस्त्र आणि चारचाकी गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून त्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्यावर तलवार, कोयता बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नातील आरोपी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती. आरोपी आप्पा दांडे, सराईत गुन्हेगार बंटी श्रीवास्तव व त्यांचे साथीदार असे चक्की नाका परिसर कल्याण पूर्व येथे प्राणघातक शस्त्रांसह दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला लागली होती.
उल्हासनगर परिमंडळ 4 अंतर्गत गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारी प्रचंड फोफावली आहे. सातत्याने गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. पोलिसांकडून आरोपींच्या मुसक्या देखील आवळल्या जात आहेत. मात्र कल्याण पूर्वेत कोयता गँग कश्यासाठी वावरत होती ? याचा तपास सध्या उल्हासनगर गुन्हे शाखेकडून सुरु करण्यात आला आहे.
सापळ्यातून आरोपी आप्पा दांडे, बंटी श्रीवास्तव हे पसार होण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या अटकेसाठी उल्हासनगर गुन्हे शाखा कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात तपास करत आहे. गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप निरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, विक्रम जाधव , रेवणनाथ शेकडे, रामदास उगले, अशोक थोरवे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
माहिती मिळताच उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक प्रवीण खोचरे यांच्या पथकाने चक्कीनाका परिसरात सापळा रचला होता. चक्की नाका परिसरात आरोपी चारचाकी वाहनांमधून येणारच त्यांचा गुन्हे शाखेने पाठलाग सुरू केला होता. मात्र आरोपी गुन्हे शाखेसमोर पलायन करण्यात अयशस्वी झाले अन् त्यांना अडवून प्राणघातक शस्त्र तलवार, कोयता ताब्यात बाळगणारे दोन इसम कुणाल कैलास गायकवाड, अशपाक अशरफ खान यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून तलवार, कोयता आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर मोटर कार असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे.