ठाणे

Ulhasnagar crime : वृद्धांना लुटणाऱ्या 'भामट्यांची' टोळी जेरबंद! उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १२ गुन्ह्यांचा उघडकीस

पुढारी वृत्तसेवा

उल्हासनगर : वृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून, त्यांची दिशाभूल करायची आणि हातचलाखीने अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करायचे... अशा प्रकारच्या गुन्ह्यांनी ठाणे, मुंबई परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत टोळीचा उल्हासनगर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींसह, त्यांना साथ देणाऱ्या एका सोनारालाही बेड्या ठोकल्या आहेत.

अशी उघड झाली गुन्ह्यांची साखळी

नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये वृद्ध नागरिकांची फसवणूक करून दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. या वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. उल्हासनगर गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अखेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.

आरोपी आणि त्यांची गुन्हे करण्याची पद्धत

या प्रकरणी पोलिसांनी रघु प्रकाश राठोड (वय ४८) आणि संजय दत्ताराम मांगे (५३) या दोन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी सार्वजनिक ठिकाणी एकट्या असलेल्या वृद्ध नागरिकांना गाठायचे. त्यांना बोलण्यात गुंतवून किंवा काहीतरी भ्रमित करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चैन, अंगठी आणि खिशातील रोख रक्कम हातचलाखीने काढून घेत असत.

सोनारही पोलिसांच्या जाळ्यात

केवळ चोरी करणारेच नाही, तर चोरीचे सोने विकत घेऊन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी सोडले नाही. वडाळा (मुंबई) येथील 'महालक्ष्मी ज्वेलर्स'चा मालक रामसिंग लालसिंग चौव्हाण याला पोलिसांनी थेट राजस्थानमधील त्याच्या मूळ गावातून अटक केली आहे.

१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून सुमारे १३० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या मुद्देमालाची किंमत अंदाजे १६ लाख ५९ हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या अटकेमुळे बदलापूर, उल्हासनगर, ठाणे आणि मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले १२ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र थोरवे, अशोक थोरवे, योगेश वाघ, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, मंगेश जाधव आणि गणेश गावडे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT