उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी पथक) धडक कारवाई करत ७ किलो ४०० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. गांजा विक्रीसाठी आलेले हे दोघेही मूळचे आंध्र प्रदेशातील असल्याचे तपासात समोर आले आहे.
उल्हासनगर कॅम्प परिसरातील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिरासमोर, भिंतीच्या आडोशाला विठ्ठलवाडी स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल बामणे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश माळी, पोलीस अंमलदार प्रमोद जाधव, सुजित भोजने, चंदू शिंदे, कृपाल शेकडे, भूषण गावडे व अतुल वाघमोडे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
राजू नीलकंठम समरडी आणि वीरास्वामी चीनालिंगा गुल्लोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, दोघेही आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी पंचनामा करून त्यांच्याकडून ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा ७ किलो ४०० ग्रॅम गांजा आणि ३२ हजार ५०० रुपये किमतीचे मोबाइल फोन, असा एकूण ४ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.