उल्हासनगर : शनिवारी रात्री अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील कॅम्प 5 मधील 39 सेक्शन येथील गणेश नगरच्या भागातील लोक वस्तीमध्ये असलेला पादचारी फुल कोसळल्याची घटना घडली होती. मात्र अद्याप पर्यंत पालिकेच्या एकही अधिकार्याने त्या ठिकाणी जाऊन पाहणी न केल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी कोसळलेल्या पुलावरच बसून महापालिकेचे लक्ष वेधण्याकरिता प्रतिकात्मक रडण्याचे आंदोलन केले.
उल्हासनगर कॅम्प 5 मधील 39 सेक्शन येथील गणेश नगर भागात नाल्यावर असलेल्या या पुलाची दुरावस्था झाली होती. स्थानिकांनी अनेक आंदोलन मागण्या करून नवा पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर शनिवारी रात्री अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळला त्यामुळे नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
स्थानिक रहिवासी राधाकृष्ण साठे यांनी तर या पुलाच्या ठिकाणी बसून प्रतिकात्मक रडण्याचे आंदोलन केले. दरम्यान हा पूल कोसळल्याने आमची गैरसोय झाली आहे प्रशासनाने लवकरात लवकर नवा पूल बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
समाजसेवक राधाकृष्ण साठे यांनी सांगितले हा पूल 20 वर्षे पूर्वीचे जुना झाल्याने धोकादायक झाला होता. हा पूल जुना झाला असून गेल्या दोन वर्षापासून हा पूल नव्याने पालिकेने बनवावा यासाठी आम्ही लढतोय. नगरपालिकेला जाग येत नाही यासाठी आम्ही या पुलाजवळ श्राद्ध घालून आंदोलन देखील केले होते. हिललाईन पोलीस ठाण्याच्या परिसरातून या नाल्याला पाणी येते. मुसळधार पावसात हा नाला पाण्याने तुडुंब भरून वाहत असतो आणि अशा अवस्थेमध्ये शनिवारी रात्री या पुलाची ही दुर्घटना घडली.
ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी एक महिला आपल्या लहान मुलासह जात होती, पण ती थोडक्यात बचावली. पूल कोसळण्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून दुर्घटना घडूनही पालिकेचा एकही अधिकारी फिरकला नाही. गोरगरिबांच्या समस्याकडे दुर्लक्ष केलं जाते. मात्र परिसरातील नगरसेवक या ठिकाणी ढुंकून देखील पाहत नाही.
दोन वर्षापासून या नाल्याची दुरावस्था झाली होती. पालिकेने या नाल्याकडे दुर्लक्ष केले असल्याने ही घटना घडली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांनी सांगितले की पूल कोसळल्याची माहिती शनिवारी रात्री शहर अभियंता हनुमंत खरात यांना देण्यात आली होती. त्यांनी रात्री पाहणी केली. दोन दिवस महापालिका बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कार्याध्यक्ष मिळाल्यावर तात्काळ पुलाचे काम सुरू होणार आहे.