Ulhas River Red Water Pudhari
ठाणे

Ulhas River Red Water: उल्हास नदीचे पाणी लालसर आणि गढूळ; कर्जतजवळील डोंगर उत्खननावर संशय

उल्हास नदी बचाव कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक बाबी उघड

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीचे पाणी अचानक लालसर आणि गढूळ झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नदी बचाव कृती समितीच्या पाहणीत नदी लाल होण्‍यामागे डोंगराचे उत्खनन कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे.

या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीने उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

समितीने नदीकाठावरील बांधकामे, डोंगर कटिंग, मातीचा भराव, नदीत वाहून जाणारा गाळ, उपनद्यांचे संगम आणि पाण्याच्या रंगातील बदल यांची नोंद घेतली. विविध ठिकाणांहून फोटो, व्हिडिओ आणि नमुने संकलित करण्यात आले आहेत.

या पाहणी दौऱ्यात शशिकांत दायमा, रविंद्र लिंगायत, राणी कपोते, अशफाक शेख, प्रशांत राऊत, हरेश सोनावळे, मोहन भागवत, सचिन आणि उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य सहभागी झाले होते.

या पाहणीत सर्वात गंभीर बाब कर्जत जवळील पिंपळोळी परिसरात आढळली. येथे चिल्हार नदीकाठावर सुरू असलेल्या अभिनंदन लोधा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर कटिंग अर्थात उत्खनन आणि वृक्षतोड झाल्याचे आढळून आले.

पूर्वी हिरवाईने व्यापलेला डोंगरभाग आता उजाड झाला असून डोंगराचा नैसर्गिक उतार पूर्णपणे बदलला आहे. ठिकठिकाणी माती घसरण आणि भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसात ही लालसर माती आणि उत्खननातील मटेरियल थेट चिल्हार नदीत वाहून जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

हा भाग चिल्हार नदीच्या जवळ असून पिंपळोळी, काळेवाडी, तलवाडे, भाकरीचा पाडा व वाकस ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कोलीवली या परिसरातून चिल्हार नदी वाहते. पुढे ती उल्हास नदीला मिळते. त्यामुळे चिल्हारमधील लालसर गाळ हाच उल्हास नदी लाल होण्याचा प्राथमिक स्रोत असू शकतो, असा संशय व्यक्त होत आहे.

पाहणीत पासह नदीतील दगडांवरही लालसर थर जमा झाल्याचे आढळले. शिवाय नदीकाठावर दगडी कंपाऊंड संरचना उभारल्याने नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होत आहे का याचीही चौकशी आवश्यक आहे.

याच दरम्यान कोंदाणे लेणी परिसर, प्लांटखालील भाग, पेज नदीकाठ व सावरगाव येथील रेल्वे यार्ड कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमधूनही माती नदीत मिसळत आहे का याची तपासणी होणे गरजेचे आहे.

पाणी सुरक्षेचा प्रश्न

या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महसूल, वन, जलसंपदा विभाग आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त पाहणी करून परवानग्या आणि गाळ रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी आहे. हा केवळ रंगाचा प्रश्न नसून नदीच्या आरोग्याचा आणि लाखो नागरिकांच्या पाणी सुरक्षेचा प्रश्न असल्याचे समितीने म्हटले आहे.

मातीची तुलनात्मक चाचणी करावी

समितीने वावे, वांजळे, बेंडसे, सावरगाव, दहीवली, नेवाळी, शेलू, बांधिवली, आडीवली, खारवडीसह अनेक ठिकाणांची पाहणी केली. मात्र वैज्ञानिक तपासणीशिवाय कोणत्याही एका प्रकल्पाला थेट जबाबदार ठरवणे योग्य ठरणार नाही.

त्यामुळे चिल्हार, उल्हास आणि पेज नदीच्या वरच्या आणि खालच्या प्रवाहात एकाच वेळी अधिकृत जलनमुने घेऊन नदीतील गाळ, काठची माती आणि उत्खननातील मातीची तुलनात्मक चाचणी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT