ठाणे : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. याच शक्तीपीठाचे एक रुप ठाण्यात साकारले आहे. प्रति तुळजाभवानी मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या हस्ते बुधवारी (दि.30) सकाळी 9. 55 मिनिटांनी होणार आहे, यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थिती लावली आहे.
ठाण्यातील नूतन तुळजाभवानी मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांची पत्नी प्रतिभा पवार, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, जयंत पाटील आदी नेते आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले.
ठाण्याच्या गणेशवाडी- पाचपाखाडी येथे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे. 33 फुटांचा कळश, नवग्रह, 26 दगडी स्तंभ, 20 गजमुखांची आरस, आकर्षक कलाकुसर, या कृष्णशिळेतून साकारण्यात आले असून त्यासाठी सुमारे 1 हजार 350 टन काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आले आहे. लोप पावत असलेल्या हेमाडपंथी शैलीला पुन:र्जिवित करीत हे मंदिर साकारले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवा सोवळा नेसून प्रायश्चित्त विधी, मूर्तीची नगरप्रदक्षिणा, यज्ञ मंडप पूजन, गणेश स्मरण, शांतीसूकर, हवन आदी पूजन करण्यात आले आहे. कलशारोहण, ध्वजारोहण, पूर्णाहुती, लोकार्पण, महाप्रसाद, रात्रौ आठ वाजता महाआरती, त्यानंतर रात्रभर गोंधळ जागरण होणार आहे.