भिवंडी : जुन्या वादाच्या रागातून एका शेत मजुरीचे काम करणार्या आदिवासी कामगाराला जातीवाचक शिवीगाळ करून त्यास तिघा सख्ख्या भावांनी आपसात संगनमताने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील पाये गावातून समोर आली आहे.
याप्रकरणी तिघांच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल्या अरुण मुकादम, मंदार अरुण मुकादम, मनिष अरुण मुकादम अशी गुन्हा दाखल झालेल्या भावांची नावे आहेत. तर परश्या पवार असे जखमी आदिवासीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार परश्या हा पाये येथील नाईक पाड्यात पत्नी व एक मुलीसह राहत असून शेत मजुरीवर उपजीविका करीत आहे.
दरम्यान जून महिन्याच्या शेवटी परश्याचा चुलत भाऊ संतोष पवार याच्याशी आरोपीत तिघा भावांचा मजुरीच्या कारणावरून वाद होऊन भांडण झाले होते. त्यावेळी तिघा भावांनी संतोषला मारहाण करून त्याची दुचाकीची तोडफोड केली होती.त्यानंतर सदर भांडण परश्याच्या मध्यस्थीने मिटले होते. परंतु याच भांडणाचा राग मनात धरून 11 जुलै रोजी परश्या हा त्याचे नातेवाईकासोबत दुचाकीने सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास पाये नाक्यावर भाजी आणण्यासाठी जात असतानाच वरील तिघांनी त्यास रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळसह गाडीच्या चावीने आणि ठोश्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.
दरम्यान सदर घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेचे हैदर कासट यांना मिळाल्यानंतर त्यांनी तालुका अध्यक्ष सागर देसक, गुरुनाथ वाघे, अमोल मुकणे, शिवदास मांगात, किशोर हुमणे, नीता घरत व नाईक पाडा येथील 25 ते 30 सभासद यांच्यासह तालुका पोलिस ठाणे गाठून पोलिस ठाण्यात परश्याच्या फिर्यादीवरून दिलेल्या तक्रारीवरून बाल्या, मंदार, मनिष या तिघांच्या विरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 प्रमाणे व बएनएस 3, (5), 351(2), 115(2), 118(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.