Tribal Ashram School Teacher Recruitment Pudhari
ठाणे

Tribal Ashram School Teacher Recruitment: आश्रमशाळांतील सर्वाधिक रिक्त पदे ठाणे, नाशिक विभागात; २,४२१ शिक्षकांची भरती होणार

शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांवर आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील चारही आदिवासी विकास विभागांमधील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षण सेवक संवर्गातील एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर या चार विभागांतील शासकीय आश्रमशाळांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ८२६ पदे, तर त्याखालोखाल ठाणे विभागात ६१३, नागपूर विभागात ५१४ आणि अमरावती विभागात ४६८ पदे रिक्त आहेत.

त्यामुळे राज्यातील आश्रमशाळांमधील सर्वाधिक रिक्त पदे नाशिक आणि ठाणे विभागात असल्याचे स्पष्ट होते. या भरतीमध्ये प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम), माध्यमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) तसेच उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशा विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही पदे पेसा आणि बिगर पेसा अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत.

शासकीय आश्रमशाळांतील एकूण २,४२१ रिक्त पदांपैकी ८८५ पदे पेसा क्षेत्रासाठी, तर १,५३६ पदे बिगर पेसा क्षेत्रासाठी आहेत. प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी बिगर पेसा क्षेत्रात ८६२, तर पेसा क्षेत्रात ४३६ जागा उपलब्ध आहेत.

प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी पेसा क्षेत्रात ६७ आणि बिगर पेसा क्षेत्रात १६१ जागा आहेत. माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) पदासाठी बिगर पेसा क्षेत्रात ३५२, तर पेसा क्षेत्रात १३८ पदे उपलब्ध आहेत. माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) पदासाठी पेसा क्षेत्रात ५ आणि बिगर पेसा क्षेत्रात २२ पदे आहेत.

उच्च माध्यमिक शिक्षकांच्या एकूण ३५७ जागा भरण्यात येणार असून, त्यापैकी २५१ पदे पेसा क्षेत्रात आणि १०६ पदे बिगर पेसा क्षेत्रात आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे.

‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणारी ही शिक्षक भरती प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. भरतीची जाहिरात, पात्रता, विषयवार पदसंख्या, पेसा-बिगर पेसा आरक्षण, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक तपशील ‘पवित्र’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील.

अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत भरतीची माहिती आणि अर्जाच्या तारखांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होणार

राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २,४२१ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे. आता ही पदे भरली जाणार असल्याने आश्रमशाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून, आदिवासी विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT