Dombivli Tree Falls On School Wall
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी परिसरात पावसाळ्यात झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी सकाळी माणिक रत्न सोसायटीच्या आवारातील आंब्याचे मोठे झाड कोसळून शेजारील शिवाई बालक मंदिर शाळेच्या मैदानात पडले. यामुळे सोसायटी आणि शाळेच्या संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने झाड पडले तेव्हा शाळेतील विद्यार्थी मैदानात नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झाड कापून बाजूला केले. पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एमआयडीसी निवासी परिसरात १५ ते १६ झाडे उन्मळून पडली आहेत. अजूनही अनेक झाडे धोकादायक स्थितीत असल्याने पुढेही अशा घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत झाडे कोसळून वाहने आणि संरक्षक भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.
औदुंबराने घेतला चारचाकी वाहनांचा वेध
सुदर्शन नगरमध्ये सोमवारी सकाळी ओम अगत्य सोसायटीच्या आवारातील औदुंबराचे झाड कोसळून दोन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने त्या वेळेत तेथे कोणीही नसल्याने कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन सदर झाड हे आता बाजूला केल्याची माहिती सोसायटीचे सेक्रेटरी सोमा नायर यानी दिली.
निवासी विभागातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून पावसाळ्यात झाड पडलेल्यांची संख्या आता १५ च्या वर गेली असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. धोकादायक झाडांचे सर्वेक्षण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि एमआयडीसीने करावे, अशी मागणी होत असल्याचे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.
तिन्ही यंत्रणांचे दुर्लक्ष
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि एमआयडीसीने याची गांभीर्याने दखल घेऊन धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करावे, अशी स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे. तसेच अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी आणि धोकादायक झाडे तातडीने तोडण्याची गरज आहे. महावितरणकडून केवळ उच्च दाबाच्या वाहिन्यांजवळील फांद्या तोडल्या जातात. त्यामुळे भार एका बाजूला होऊन झाडे पडत आहेत. त्यामुळे महावितरण, केडीएमसी आणि एमआयडीसीने एकत्रितपणे फांद्या छाटणीचे काम करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.