ठाणे : घोडबंदर प्रमाणे औद्योगिक पट्टा असलेल्या वागळे परिसरातही वाहतूक कोंडी आणि बेकायदा पार्किंगमुळे लघु उद्योजक अडचणीत आले आलेत. यातून मार्ग काढण्यासाठी शनिवारी लघु उद्योजक आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांमध्ये महत्वाची बैठक झाली असून पार्किंग दिशादर्शक लावण्यासोबतच बीट मार्शल नेमण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिले आहेत.
लहानमोठ्या उद्योगाची पंढरी असलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये एमआयडिसीचा शिरकाव झाल्यानंतर गजबजाट वाढला. कालांतराने काही उद्योग बंद पडल्याने वागळे परिसरात बेकायदा झोपडपट्टया आणि अतिक्रमणे वाढली. आता तर बंद कंपन्यांच्या जागी भव्य आयटी क्षेत्र उभारण्यात आल्याने वर्दळीत भरच पडली आहे. राजकिय वरदहस्तातुन रस्त्यावर तसेच कंपन्यांच्या प्रवेशद्वारापर्यंत अनेक छोटी मोठी दुकाने थाटून अतिक्रमणे सुरूच आहेत. यामुळे मालवाहतुक करणारी वाहने उद्योगाच्या आवारात पोहचणे महाकठीण होऊन बसले आहे.
जागोजागी अतिक्रमणे वाढली असुन स्थानिक रहिवाश्यां करीता सुरू झालेल्या आठवडा बाजाराने वागळे भागाची पुरती कोंडी होत आहे. यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. ट्राफिक आणि पार्कीग समस्येच्या या दररोजच्या कटकटी विरोधात टिसाने आवाज उठवला असुन थेट पोलीस आयुक्त आशुतोष
डुंबरे यांना साकडे घातले आहेत. त्यानुसार उद्योगांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी ठाणे शहर वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी शनिवारी ६० ते ७० उद्योजकासह बैठक घेतली. या बैठकीत उद्योगांच्या वाहतूक व पार्किंगशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
4 अंमलदार, 2 बिट मार्शल नेमण्यात येणार
दरम्यान, आजपासून ४ अंमलदार, २ बिट मार्शल नेमण्यात आले असून बेशिस्त वाहन चालकांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून वन वे, पी-१, पी-२ पार्किंग, दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. कारखानदारांच्या समस्या सोडवण्यात येतील, अशी माहिती पंकज शिरसाट यांनी दिली आहे.