Malanggad Tourist Dangerous Selfies
नेवाळी : अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंग गडावरील खडकेश्वर मंदिर सध्या पर्यटक आणि भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असताना, याच परिसरातील धोकादायक दरीच्या काठावर जाऊन फोटोसेशन आणि सेल्फी घेण्याचा प्रकार समोर येत आहे. खडकेश्वर मंदिराच्या परिसरातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्यामध्ये पर्यटक अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन बसताना, उभे राहताना तसेच फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसत आहेत. निसर्गरम्य परिसरातील क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात पर्यटक अक्षरशः आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या व्हिडिओंवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून श्री मलंगगडाच्या पायथ्याशी पर्यटकांना आवर घालणाऱ्या यंत्रणांना आता थेट धोकादायक दरी कडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे.
श्री मलंगगड हा धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. डोंगररांग, उंच कडे, दऱ्या आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे या परिसराकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. याच आकर्षणामुळे अनेक जण खडकेश्वर परिसरात दर्शनासाठी येण्याबरोबरच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि सोशल मीडियासाठी फोटो, रील्स तसेच व्हिडिओ तयार करण्यासाठी विविध ठिकाणी जात आहेत.
मात्र, निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेची मर्यादा ओलांडली जात असल्याने आता हा प्रकार चिंतेचा विषय बनला आहे. खडकेश्वर मंदिराच्या लगत असलेल्या दरीचा परिसर विशेषतः धोकादायक मानला जातो. दरी खोल असल्याने तेथे पाय घसरल्यास किंवा तोल गेल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात डोंगरावरील माती आणि दगड निसरडे होतात. त्यातच सततच्या पावसामुळे कड्याच्या काठावरील जमीन सैल होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत केवळ काही क्षणांचा फोटो किंवा व्हिडिओ मिळवण्यासाठी दरीच्या अगदी काठावर जाणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करण्यासारखे आहे.
विशेष म्हणजे, धोकादायक ठिकाणी बसताना किंवा उभे राहताना अनेक पर्यटकांना त्या क्षणी धोका जाणवत नाही. मोबाईलच्या कॅमेऱ्यात चांगला फोटो यावा, व्हिडिओमध्ये वेगळा अँगल मिळावा किंवा सोशल मीडियावर रील अधिक आकर्षक दिसावी, या उद्देशाने पर्यटक धोक्याची जागा निवडतात. मात्र अशा ठिकाणी एक छोटीशी चूकही आयुष्यभराची दुर्घटना ठरू शकते. फोटो आणि व्हिडिओ काही सेकंदांचे असतात; मात्र त्यासाठी गमावलेला जीव परत मिळू शकत नाही, याचे भान पर्यटकांनी ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा तोल जाऊन दरीत कोसळून पर्यटकांना जीवाला मुकावं लागणार आहे.