नेवाळी नाका पोलीस चौकी Pudhari News Network
ठाणे

Tourists Lost | तावली पर्वतावर मुंबईतील चार पर्यटक भरकटले

मोबाईल टॉर्चच्या उजेडात हिललाईन पोलिसांनी घेतला चौघांचा शोध

पुढारी वृत्तसेवा

ठाणे (नेवाळी) : शुभम साळुंके

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या तावली पर्वतावर पर्यटक हे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. मात्र वाट चुकल्याने अनेकजण अडकून बसलेले असतात. मंगळवारी (दि.22) मुंबईतील चार जण तावली डोंगरावरील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मात्र घनदाट जंगलात ते वाट चुकल्याने चौघेही अडकले.

वाट भरकटलेले चौघांनी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ११२ या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानंतर हिललाईन पोलिसांच्या नेवाळी बिट चौकीतील पथकाने मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने या चौघांची सुखरूप सुटका केली आहे. पर्यटकांची यशस्वी सुटका झाल्यानंतर पोलिसांचे आमदार चित्रा वाघ यांनी दूरध्वनी वरून संपर्क साधत कामगिरीचे कौतुक केले.

ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड भागातील निर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र परिसराची माहिती पर्यटकांना नसल्याने अनेकजण अडकून बसतात. मंगळवारी मुंबईच्या दादर परिसरातील चार तरुण तावली पर्वतावर भटकंतीसाठी आले होते. सकाळी ते तावली पर्वतावर गेले असता घनदाट जंगलात ते वाट चुकले अन घाबरून राहिले होते. त्यांनी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ११२ नंबरवर संपर्क साधत मदत मागितली होती. मात्र पोलिसांकडे मदतीसाठी आलेला फोन त्यावर स्थानिक हिल लाईन पोलिसांकडून संपर्क सुरु करण्यात आला होता.

घाबरलेल्या पर्यटकांचा फोन खोल दरीत पडल्याने त्यांच्याशी संपर्क साधने देखील पोलिसांना अवघड झाले होते. हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अंकुश सुरेवाड, पोलीस हवालदार संदीप मुसळे, नाईक प्रशांत पाटील यांनी सुमारे पाच पेक्षा अधिक तास पर्वतावर शोध मोहीम घेत चौघांचा शोधलं घेतला आहे. मंगळवारी (दि.22) सायंकाळी चौघांना सुरक्षितरित्या खाली उतरवत स्थानिक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी अवघ्या काही वेळात शोध मोहीम हाती घेत चौघांना वाचवल्याबद्दल भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले आहे. बुधवारी (दि.23) भाजपा आमदार चित्रा वाघ या हिललाईन पोलीस ठाण्याला भेट देणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी अवघड ऑपरेशन काही वेळात अपुऱ्सा साहित्यासह पूर्ण केल्याने त्यांचे कौतुक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या या डोंगराळ भागात बिबट्या सह अन्य जंगली प्राण्यांची वर्दळ आहे. त्यामुळे परिसरात स्थानिकांकडून पर्यटकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळोवेळी दिल्या जातात. मात्र काही अतिउत्साही पर्यटक स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत बिनधास्त जंगलाची वाट धरून अडकून बसत असल्याचे चित्र समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT