दापोली : प्रवीण शिंदे
कोकणच्या पर्यटनात, दापोलीतील पर्यटनाचा वारसा लाभलेल्या आंजर्लेचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते. विस्तीर्ण समुद्र किनारे आणि मंदिर समूहांनी नटलेल्या आंजर्ले येथील खाद्यसंस्कृती परिचित आहे. येथील कड्यावरच्या गणपतीची ओळखही सर्वदूर आहे. त्यामुळे या गावात बारमाही पर्यटकांचा ओघ असतो. पूर्वी निजसुरे नामक व्यक्तीला दृष्टांत झाल्यानंतर या मंदिराची स्थापना कड्यावर करण्यात आली.
पर्यटकांचे आकर्षण आणि भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून श्री कड्यावरील गणपती मंदिराची वेगळी ओळख आहे. हे मंदिर केवळ आंजर्ले गावचेच नाही तर संपूर्ण कोकणाचे भूषण आहे. या देवळातील वार्षिक उत्सव माघी चतुर्थीला असतो. यावेळी भक्तांची गर्दी आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. गावकर्यांनी वर्षानुवर्षे चालत आलेला सांस्कृतिक वारसा जपला आहे. गावातील प्रत्येक सण उत्सव पारंपरिक पद्धतीने, त्याचे वैशिष्ट्य जपत साजरा होतो. या ठिकाणी गणपतीच्या दोन पाऊलखुणा आहेत. एक मंदिरात तर एक मंदिराबाहेर अशी आख्यायिका आहे.
प्रमुख ग्रामदेवता श्री सावणेकरीण. गावच्या उत्तर भागास सावणे म्हटले जाते. त्याच भागात हे देवालय आहे. ही देवता उत्तराभिमुख आहे. ती गावावर उत्तरेकडून येणार्या संकटाचे निवारण करते, अशी श्रद्धा आहे. ओढ्याच्या काठावर, आंबा, काजूंच्या बागांच्या सानिध्यात हे सुंदर कौलारू मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा अर्थात देव दिवाळीला इथला उत्सव असतो. या बरोबरच पेठकरीण (पेठपाखडीत) पश्चिमाभिमुख व दारूवटकरीण (बहिरी मंदिराजवळ) पूर्वाभिमुख या दोन ग्रामदेवता आहेत. गावात श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर (कोपरी), श्री रामजी मंदिर, गणपती मंदिर व श्री हरिहरेश्वर मंदिर (पेठपाखाडी), श्री दत्त मंदिर (उभागर), श्री विठ्ठल मंदिर (भंडारवाडा) अशी देवस्थाने आहेत.
आंजर्ले गावचे अजून एक महत्त्वाचे देवस्थान म्हणजे श्री दुर्गादेवी मंदिर. देवीचा वार्षिक उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र वद्य चतुर्थीपर्यंत असतो. यातील रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. श्री दुर्गादेवी उत्सव हा गावचा मोठा उत्सव, त्याचबरोबर गणेशोत्सव आणि शिमगा हे महत्त्वाचे सण. गणेशोत्सवात आवर्तने, भजने, कीर्तने असे कार्यक्रम चालतात. गावातील गणपती मिरवणुका खालूबाजाच्या तालावर चालतात. सर्व गणपतींचे विसर्जन समुद्रात होते. गणेशोत्सवानंतर कोकणवासीयांचा प्रिय सण म्हणजे शिमगा. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून श्री भैरवाचा काटखेळ ताडाच्या कोंडावरील मंडळी काढतात.
पर्यटन केंद्र म्हणून आंजर्ले गाव नावारूपाला येत आहे. गेल्या दोन दशकांत गावात वेगाने बदल झाले. यामागचे मुख्य कारण ठरला आंजर्ले खाडी पूल. हा पूल होण्यापूर्वी आंजर्ले येथे येण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत होता. बंदरावरून होडीने गावात यायला लागत असे. त्यात भरती किंवा ओहोटी, प्रचंड पाऊस, समुद्राचे उधाण या कारणाने हा प्रवास खडतर होत असे. गाडी रस्ता कांदिवली मार्गे, वाकडा आंजर्लेमार्गे, दापोली-आंजर्ले अंतर 45 किमी होते. एका पुलाने हे अंतर 22 किमी केले. त्यामुळे गावचे दळणवळण सोपे झाल्याने पर्यटक येऊ लागले आहेत.
अथांग पसरलेला समुद्र आणि शांत, स्वच्छ किनारा मोहिनी घालतोच त्याचबरोबर थंडीत प्रजोत्पादनासाठी येणार्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासव माद्या आणि फेब्रुवारी मार्च महिन्यात त्यातून बाहेर येणारी शेकडो लहान लहान पिल्ले, त्यांची समुद्रात जायची लगबग सर्वच बघण्यासारखे असते. या कासवांच्या संवर्धनासाठी गावातील तरुण कासव मित्र विशेष काळजी घेतात, मेहनत घेतात. पिल्ले बाहेर येण्याच्या काळात कासवांचे संरक्षण आणि पर्यटकांना आकर्षण यासाठी कासव महोत्सव आयोजित केला जातो.
आंजर्ले-मुंबई प्रवास 224 कि.मी.
खेड भरणा नाका येथून 57 कि.मी.
दापोली येथून बायपास 27 कि.मी. अंतर
दापोली बाजारपेठेतून 24 कि.मी.
या ठिकाणी यायचे तर मुंबई-गोवा हायवे, तसेच सागरी महामार्गानेदेखील आंजर्लेला येऊ शकता. मुंबई, महाड आंबेतमार्गे मंडणगड, दापोली असा प्रवास करता येतो. मंडणगडमार्गे बाणकोट आंजर्ले असा प्रवासदेखील करता येतो.