केट्स पॉईंट Pudhari News Network
ठाणे

जावा पर्यटनाच्या गावा...महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटनस्थळे खुणावू लागली

पुढारी विशेष ! पर्यटनाचा निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद आनंद लुटा

पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर/पाचगणी : उन्हाळी हंगाम सुरू झाला असून पर्यटनस्थळी बहरू लागली आहेत. नागरिकांनी उन्हाळी सुट्टीतील पर्यटनाचे बेत निश्चित केले असून सवड मिळेल त्यानुसार पर्यटनाचे नियोजन सुरू आहे. पर्यटनाचा निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद लुटायचा असेल तर तुम्हाला अनेक पर्यटनस्थळे खुणावू लागली आहेत.

जागतिक पर्यटनस्थळ म्हणून लौकिक मिळवलेल्या महाबळेश्वर, पाचगणीची सार्‍यांनाच भुरळ पडली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, किल्ले प्रतापगड, मिनी काश्मीर, तापोळा ही पर्यटनस्थळे सलग असल्याने पर्यटक या ठिकाणी पसंती देत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन निसर्गाने परिपूर्ण भरलेले आणि सह्याद्रीच्या उत्तंग गिरिशिखरावर वसलेले एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून महाबळेश्वर ओळखले जाते. येथे येणार्‍या पर्यटकाला आज घोडेसवारीपासून गो कार्टिंगपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. येथील स्थानिक लोकांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, फुले, हाताने घडवलेल्या चामड्याच्या चप्पल्स येथे सहज उपलब्ध होतात. वेगवेगळ्या ऋतूत येथील निसर्गसौंदर्याचा अनोखा नजराना पाहायला मिळतो, त्यामुळे विदेशी पर्यटकांना इथे येण्याचा मोह आवरत नाही. वैशाख व ज्येष्ठ महिन्याच्या उंबरठ्यावर येणारे सुखद धुक्याचे वातावरण आणि यानंतर तीन ते चार महिने पडणारा मुसळधार पाऊस, या सार्‍या ऋतुचक्रात महाबळेश्वरचे सौंदर्य नेहमीच बदलताना दिसते.

जुने क्षेत्र महाबळेश्वर :

हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे.

महाबळेश्वर शहरापासून तीन कि.मी.वर महाबळेश्वर- पाचगणी मुख्य रस्त्यावर वेण्णालेक स्थित आहे.

विविध पॉईंटस् : परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केटस् पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबिंग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट, फॉकलंड पॉईंट, बगदाद पॉईंट आदी वैशिष्ट्यपूर्ण पॉईंट महाबळेश्वर परिसरात आहेत.

वेण्णालेक नौकाविहार :

महाबळेश्वर शहरापासून तीन कि.मी.वर महाबळेश्वर- पाचगणी मुख्य रस्त्यावर स्थित आहे. महाबळेश्वर पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण अशी वेण्णालेक परिसराची ओळख आहे. पॅडल व रोलिंग बोटींमधून नौकाविहारसह येथील चौपाटी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणावे लागेल. सूर्यास्ताचे विहंगम द़ृश्य थंडीची अनुभूती, बालचमूसाठी गेम्सची धूम खवय्यांसाठी लज्जतदार पदार्थांची मेजवानी सोबतच घोडसवारी त्रिलिंग अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची येथे तोबा गर्दी पाहावयास मिळते.

टेबल लँड :

पाचगणी शहराचे मुख्य आकर्षण असलेल ठिकाण म्हणजे टेबल लँड. पाच पठार एका ठिकाणी असल्याने या परिसराला पाचगणी नाव पडले. समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचीसह निसर्गाच्या कुशीत झाडांच्या गर्दीत असलेले आशियातील दुसरे सर्वात लांब पठार आहे. इथे फिरण्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज असलेली घोडा गाडी, घोडेसफारी इथला आकर्षणाचा विषय असतो. श्रावण महिन्यात हा परिसर पांढर्‍या शुभ्र गेंद फुलांनी बहरलेला असतो. या ठिकाणी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमाचे या ठिकाणी चित्रीकरण झाले आहे. येथून सह्याद्री पर्वत रांगांचे अलौकिक द़ृश्य पाहायला मिळते. याच ठिकाणी पाच पांडव पायाच्या खुणादेखील पहायला मिळतात.

पारसी पॉईंट :

पाचगणीपासून दीड किलोमीटर मुख्य रस्त्यावर उंच कड्यवार असलेले हे महत्त्वाचे ठिकाण. पारशी समुदायाचे निगडित असल्याने याला पारशी पॉईंट नाव देण्यात आला. येथून कृष्णा खोरे, धोम धरण आणि डोंगररांगांचा अभूतपूर्व संगम पहायला मिळतो.

सिडनी पॉईंट :

सिडनी पॉईंट एका लहान टेकडीवर असणारे ठिकाण आहे. येथून धोम धरणाच्या पाण्याचे दर्शन घडवते आणि कृष्णा खोरे आणि जवळच्या वाई आणि मांढरदेव या टेकडी दर्शन ही इथून करता येते. डोंगर रांगावर हिरवीगार चादर पसरल्याचे द़ृष्य अनुभवता येते.

गुहा :

टेबल लँडच्या पठारामध्ये दोन गुहा आहेत. माजी सैनिक गोविंद गोडस यांनी ही गुहा पर्यटकांना पाहता यावी याकरिता प्रयत्न करून पर्यटनासाठी खुली केली आहे. जंगल आणि सह्याद्री पर्वतरांगांची द़ृष्ये पहायला मिळते. या गुहांमध्ये आल्यावर निसर्गाचा अद्भुत कलेचे दर्शन होते.

मिनी काश्मीर तापोळा :

महाबळेश्वर व जावली तालुक्याच्या सीमेवर तापोळा हे गाव आहे. या ठिकाणी मोठ मोठे तलाव, कृषी पर्यटन केंद्रे व बोटिंगचा आनंद पर्यटकांना घेता येतो. तापोळ्यालगतच जावलीचे कांदाटीचे खोरे असल्याने हिरवे गार जंगल अन् निसर्गाच्या सानिध्यात पर्यटक आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू शकतात.

किल्ले प्रतागड :

महाबळेश्वरपासून 20 कि.मी. अंतरावर असणार्‍या किल्ले प्रतागडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यालाही लाखो पर्यटक भेट देतात. किल्ल्यावरील भवानी मातेचे मंदिर, बुरूज पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. किल्ल्यावरून कोकण कडा आणि निसर्गाचा अद्भुत नजारा पहायला मिळतो.

असे जाता येईल या पर्यटनस्थळी

महाबळेश्वरला विमान, रेल्वे किंवा रस्त्याने जाता येते. सर्वात जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वाठार आहे. जे दोन्ही भारतातील प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहेत. तेथून महाबळेश्वरला जाण्यासाठी टॅक्सी किंवा बसने जाता येते. महाबळेश्वर हे पुणे विमानतळापासून 130 कि.मी. अंतरावर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 271 कि.मी.वर आहे. तुमच्या प्रवासाची सुरुवात कुठून असणार आहे त्याच्यावर बरेच अवलंबून आहे. जर तुमचा प्रवास मुंबईहून करणार असाल तर 285 किमी, पुण्याहून करणार असाल तर 120 कि.मी. आणि सातारा येथून असेल तर 65 कि.मी. अंतर आहे. पुणे येथून महाबळेश्वर 120 कि.मी. असून पुणे-बेंगलोर हायवेवरून सुरूरकडे जाणार्‍या मार्गाने प्रथम वाई शहर त्यानंतर पाचगणी व नंतर महाबळेश्वरात येता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT