पालघर : निखिल मेस्त्री
पालघर जिल्हा मुंबई, गुजरातला जवळचा असल्याने तेथील पर्यटकांसाठी पालघरचे सागरी पर्यटन एक उत्तम डेस्टिनेशन आहे. पर्यटकांसाठी जिल्ह्यातील समुद्र किनारे सुरक्षित व सोयीचे असल्यामुळे येथील किनारी पर्यटन भरारी घेत आहे.
संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी लालधुंद चादर ओढलेले आकाश त्यातून दिसणारा लालबुंद मावळता सूर्य, उंटाच्या स्वारीतून येणारी मजा, पाण्याच्या लाटांना कापत सवारी घेऊन धावत जाणारा टांगा, स्पोर्ट बाईकची रपेट अशा करमणुकीच्या साधनांचा मनमुराद आनंद मिळत असल्यामुळे पालघर जिल्ह्यातील हे किनारे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.
पालघर जिल्ह्यात वसई, पालघर व डहाणू हे तीन तालुके प्रामुख्याने सागरी भागाशी जोडलेले आहेत. रेल्वेमार्ग व रस्ते मार्गाने या तालुक्यांना सहजपणे जोडल्याने पर्यटकांना किनारे भटकंतीसाठी वाव मिळत आहे. शिवाय किनारी भागात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटक या ठिकाणी येत आहेत. सुरक्षित, स्वच्छ, सुंदर, नयनरम्य समुद्रकिनार्यांमुळे पर्यटकांचा ओघ पालघर जिल्ह्यात वाढत चालला आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळत असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत आहे.
वसई तालुक्यात राजोडी व अर्नाळा हे दोन किनारे किनारा पर्यटनासाठी ओळखले जातात. प्रशस्त किनारा व सुरूंच्या बागांमध्ये मदमस्त हुंदडण्यासाठी अर्नाळा बीचवर पर्यटकांचा कायम ओढा असतो. शांत वातावरणात उंटाची स्वारी, उसळत्या लाटांमधून वाट काढत सवारी नेणारा टांगा व सूर्यास्ताच्या वेळी फोटोग्राफरकडून छायाचित्रे काढण्यासाठी लगबग करणारे पर्यटक असे नेहमीचे चित्र अर्नाळा बीचवर दिसते.
महाराष्ट्राच्या नकाशावर केळवे बीच किनारा पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असून, पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. या किनार्यावर वर्षभर पर्यटकांची रेलचेल सुरू असते. येथे असलेल्या सुरूंच्या बागांमध्ये वनभोजनाचा आनंद लुटण्याची मजा काही औरच आहे. शिवाय किनार्यावर लहान मुलांपासून मोठ्या पर्यंतच्या सर्वांसाठीच करमणुकीची विविध साधने उपलब्ध असल्यामुळे केळवे बीचला विशेष पसंती आहे. केळवेचा किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असून, ताजे मासे खाण्यासाठी पर्यटक विशेषतः येथे येत असतात. केळवे समुद्रकिनारी शितलादेवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांसह भाविकांची मांदियाळी असते.
केळवे समुद्रकिनार्यापासून अवघ्या सहा-सात किलोमीटरवर असलेल्या शिरगावचा शांत समुद्रकिनारा सध्या पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. शिरगावच्या समुद्र पर्यटनासाठी संध्याकाळची वेळ उपयुक्त आहे. शिरगाव येथील ऐतिहासिक किल्ल्यामुळे इतिहासाच्या शौर्याची माहिती पर्यटकांना मिळते. शिरगाव समुद्रकिनारा पर्यटकांसाठी हल्लीच्या काळात त्याच्या सौंदर्यामुळे पर्यटकांना खुणावू लागला आहे.
डहाणूच्या समुद्रकिनार्यांना पर्यटक आवर्जून भेट देतात. तालुक्यातील चिंचणी समुद्रकिनारा सध्या चांगलाच प्रसिद्ध होत असून, येथे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत चालला आहे. स्वच्छ सुंदर समुद्रकिनार्यामुळे शांततेच्या वातावरणात किनार्यावर फिरण्यासाठी हा किनारा एक उत्तम पर्याय आहे. पारनाका समुद्र किनारा हा डहाणूतील एक चांगला किनारा आहे. किनारी भागातील हातगाड्यांवरील बर्फाचा गोळा, भेळपुरी, पाणीपुरी, चाट, आईस्क्रीम, वडापाव अशा विविध खाद्यपदार्थांवर ताव मारून खाण्याची येथील मजाही काही वेगळीच आहे.
पारनाका बीचपासून नरपड, चिखले हे शांत समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच खुणावत आहेत. पालघर जिल्ह्यातील बोर्डी किनारा हा सर्वपरिचित असून, किनारी, कृषी व निसर्ग पर्यटनासाठी हा परिसर एक उत्तम पर्याय आहे. महाराष्ट्रातील चिकूचे गाव घोलवड हे गाव याच परिसरात आहे. त्यामुळे बोर्डीला वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बोर्डी समुद्रकिनारा विस्तीर्ण असून, येथील सफेद वाळू पर्यटकांना आकर्षित करते.
पालघर जिल्हा हा सागरी नागरी डोंगरी भागात विभागला गेला असला, तरी येथील सागरी सौंदर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक किनारा पर्यटनासाठी येत आहेत. किनारा पर्यटनाच्या माध्यमातून किनारपट्टी भागात रोजगाराच्या नवनवीन साखळ्या तयार होत असून, किनारी पट्टा स्वयंरोजगार पूर्ण बनत आहे. किनारी भागांमध्ये पर्यटकांसाठी चांगल्या भौतिक सुविधा उपलब्ध असून, विविध सोयी-सुविधा असल्यामुळे या किनार्यांकडे पर्यटकांचा मोठा कल दिसून येतो.
वसई तालुक्यातील राजोडी बीच, अर्नाळा बीच पालघर तालुक्यातील केळवे बीच, शिरगाव बीच, सातपाटी बीच, डहाणू तालुक्यातील चिंचणी, पार नाका, नरपड, चिखले, बोर्डी, झाई असे किनारे आहेत.
मुंबईहून डहाणूला जाण्यासाठी दर अर्धा ते पाऊण तासाने लोकल आहे. शिवाय मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 हा पालघर, डहाणू व वसईला जोडल्यामुळे या महामार्गाने येणे सहज सोपे आहे.
वसई राजोडी येथे जाण्यासाठी वसई स्थानकावर उतरून सार्वजनिक किंवा खासगी प्रवासी वाहनांनी जाता येते. मुंबई-अहमदाबाद महामार्ग मार्गे वसई व राजोडी जाता येते.
अर्नाळा बीचवर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकावरून सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहनांनी जाता येते. मुंबई अहमदाबाद महामार्ग विरार फाटा व पुढे अर्नाळा येथे जाऊ शकतात.
केळवे समुद्रकिनारी जाण्यासाठी रेल्वेने केळवे स्थानकावर उतरून सार्वजनिक किंवा खासगी प्रवासी वाहनाने केळवे येथे जाता येते. महामार्गावर वरई फाट्यामार्गे सफाळे किंवा पालघरहून केळव्याला जाता येते.
शिरगाव बीचवर जाण्यासाठी पालघर रेल्वे स्थानकावरून सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने उपलब्ध असतात. तर महामार्गमार्गे मनोर पालघर शिरगाव असे जाता येते.
डहाणूतील चिंचणी येथे जाण्यासाठी डहाणू किंवा वानगाव रेल्वे स्थानकावर उतरून सार्वजनिक व प्रवासी वाहनाने जाता येते. पारनाका, नरपड, चिखले या समुद्रकिनार्यावर जाण्यासाठी डहाणू रेल्वे स्थानकावर उतरून तिथून सार्वजनिक किंवा प्रवासी वाहनांनी जाता येते. तर बोर्डी, झाई समुद्रकिनारी जाण्यासाठी घोलवड रेल्वे स्थानक येथून सार्वजनिक किंवा खासगी प्रवासी वाहनाने जाता येते. महामार्गावरून डहाणूच्या समुद्रकिनार्यावर जायचे असल्यास चारोटी मार्गे डहाणू धाकटी डहाणू मार्गे चिंचणी तर डहाणू मार्गे पश्चिमेकडे पार नाका, नरपड, चिखले, बोर्डी, घोलवड झाई अशा सागरी महामार्गाने जाता येते.