संगमेश्वर : तालुक्यातील निसर्गसंपन्न मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. Pudhari News Network
ठाणे

जावा पर्यटनाच्या गावा... रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसंपन्न ‘मार्लेश्वर’ची राज्यभर ख्याती

सह्याद्री पर्वतरांगांतील कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी गुहेत आहे देवस्थान; बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

साडवली (रत्नागिरी): मिथुन लिंगायत

रत्नागिरी जिल्ह्यातील संंगमेश्वर तालुक्यातील स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची ख्याती राज्यभर पसरली आहे. हे देवस्थान सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील कडेकपारीत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेत वसले आहे. मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक या तीर्थक्षेत्री येत असतात. हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणूनही राज्यात प्रसिद्ध आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संंगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरापासून सुमारे 18 कि. मी. अंतरावर स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान आहे. देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. राज्य शासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या सभोवती उंच ताशीव कडे आहेत. या कड्यांचे दर्शन होताच पर्यटकांच्या चेहर्‍यावर आनंदाचे भाव पाहावयास मिळतात. याचे कारण याठिकाणी असणार्‍या कड्यांचे रूप व सौंदर्य इतर कुठेही दिसत नाही, हे मार्लेश्वर पर्यटनस्थळाचे वेगळेपण आहे. मारळ गावात स्वयंभू मार्लेश्वर देवस्थान आहे. चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि डोंगर आहेत. मंदिराजवळ आल्यानंतर थोडे खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे मंदिर आहे. या ठिकाणी ओढ्याच्या पात्रातील मोठमोठ्या शिळांवरून उड्या मारत धबधब्याच्या जवळ जाता येते. या धबधब्याचे ‘धारेश्वर’ असे नाव आहे. जवळपास दोनशे फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतो. धबधब्याच्या खाली असणार्‍या डोहास ‘करंबेली डोह’ असे म्हणतात. धबधबा पुढे बाव नदीला जाऊन मिळतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे खूप पवित्र मानले जाते. पावसाळ्यात येथे पाण्याला ओढ असल्याने हा धबधबा दुरूनच पाहावा लागतो. पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगरकड्यातून छोटे - छोटे धबधबे कोसळत असल्याने हे मनोहारी द़ृश्य पर्यटकांना पाहता येते.

मार्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे मोदक, भाजणीचे वडे, घावन रस, आंबापोळी, फणसपोळी, कोकम, कोकम सरबत, आंब्याचे पन्हे, आंब्याचे लोणचे, त्याचप्रमाणे रत्नागिरी हापूस आंबा, फणस, करवंदे यासारखा रानमेवा आणि खाद्यपदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. येथे केवळ शाकाहारी जेवण मिळते.

असे जाता येईल मार्लेश्वरला

मार्लेश्वरला जाण्यासाठी एसटीची सुविधा आहे. कोल्हापूरहून येताना आंबा घाटामध्ये कळकदरा येथून खडीकोळवणमार्गे मार्लेश्वर सुमारे 20 कि. मी. अंतरावर आहे. रत्नागिरीहून किंवा मुंबईहून येताना देवरूखहून हातीवमार्गे सुमारे 18 कि. मी. दूर आहे. मार्लेश्वर येथे पायथ्यापर्यंत पाणी वाहन जाते. तेथून साधारण एक किलोमीटरचा चढ असून, 500 पायर्‍या चढून मंदिरात जावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT