पनवेल : विक्रम बाबर
विविध रंगाचे पक्षी, त्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे विविध प्रकारचे सुमधुर आवाज, आणि निरागसता प्रत्येकाला आवडते आणि म्हणूनच पक्ष्यांचे वास्तव्य असलेल्या जंगलात जाण्याची प्रत्येकाची अभिलाषा असते. त्यातूनच बर्डफोटोग्राफर, गिर्यारोहक आणि पर्यटक यांचे पाय आपोआपच राज्यातील पहिल्या कर्नाळा पक्षी अभयारण्याकडे वळतात.
रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हे कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य सर्वांना माहिती होऊन त्या बाबतचे आकर्षण वृद्धिंगत होण्याचे कारण म्हणजे कर्नाळा अभयारण्याला विशेषत: कर्नाळ्याचा डोम केंद्रभागी ठेवून सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि अभिनेत्री (स्व.) स्मिता पाटील यांच्या भूमिका असलेला दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा ‘जैत रे जैत’ चित्रपट आहे. हा चित्रपट लोकांसमोर आला आणि कर्नाळा अभयारण्याकडे राज्यातील पर्यटक आणि गिर्यारोहकांचा ओघ सुरू झाला आणि आजही पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात येत आहेत. कर्नाळा किल्ला अभयारण्यात टेकडीच्या माथ्यावर आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासाचा मध्यम कठीण प्रवास आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य देशातील एक महत्त्वाचे पक्षी अधिवास क्षेत्र असून, जागतिकद़ृष्ट्या धोक्यात असलेल्या काही प्रजाती आणि प्रतिबंधित-श्रेणीच्या प्रजाती येथे सुरक्षित आहेत. कर्नाळा अभयारण्याचे आणखी एक आगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली तब्बल 114 प्रजातींची फुलपाखरे हे आहे.
12.11 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे हे विस्तीर्ण कर्नाळा अभयारण्य मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून सुमारे 70 कि.मी. अंतरावर असल्याने दर रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांचा येथे मोठा ओघ असतो. हे अभयारण्य ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्यावर केंद्रित आहे. मुंबई - पुणे परिसरातील पक्षी निरीक्षक आणि गिर्यारोहकांसाठी हे अभयारण्य एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. या अभयारण्यात 222 पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आहेत. त्यापैकी 161 निवासी प्रजाती आहेत, 46 हिवाळ्यातील स्थलांतरित प्रजाती आहेत, तर तीन प्रजाती प्रजनन स्थलांतरित आहेत. सात प्रजाती मार्ग स्थलांतरित आहेत आणि पाच प्रजाती भटकंती करणार्या आहेत.
राखाडी हिरवे कबुतर (ट्रेरॉन एफिनिस),
निलगिरी वूडकबुतर (कोलंबा एल्फिन्स्टनी),
मलबार (निळ्या पंखांचा)
पॅराकीट(पिटाकुला कोलंबोइड्स),
मलबार ग्रे हॉर्नबिल(ओसायसेरोस ग्रिसियस),
पांढर्या गालाचा बार्बेट(मेगालाईमा विरिडिस),
मलबार लार्क(गॅलेरिडा मालाबारिका),
लहान सनबर्ड (लेप्टोकोमा मिनिमा)
व्हिगोर्स सनबर्ड (एथोपीगा विगोर्सी)
राखेचा मिनिव्हेट,
तीन-पंजे असलेला किंगफिशर,
मलबार ट्रोगॉन,
स्लॅटी-लेग्ड क्रॅक (रॅलिना युरिझोनॉइड्स)
रुफस-बेलीड ईगल (लोफोट्रिओर्चिस किनेरी)
सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन पनवेल. येथे देशातील कोठूनही रेल्वेने पोहोचता येते.
पनवेलपासून कर्नाळा अभयारण्य केवळ 12 कि.मी. अंतरावर आहे.
पनवेल बस स्टँडवरून सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर 30 मिनिटांच्या अंतराने नियमित एस.टी. बसेस उपलब्ध आहेत.
पुणे - कर्नाळा अंतर 122 कि.मी. तर मुंबई -कर्नाळा अंतर 62 कि.मी. आहे.
कर्नाळा अभयारण्य सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.
अभयारण्याजवळ अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्टस् आहेत.
अभयारण्याच्या परिसरात दोन सरकारी विश्रामगृहे आहेत.