आंबोली : निर्णय राऊत
जैवविविधतेने परिपूर्ण आंबोली या पर्यटनस्थळाची वेगळी ओळख जागतिक स्तरावर आहे. देशातील सर्वाधिक पाऊस पडणार्या ठिकाणांपैकी एक म्हणून महाराष्ट्राची चेरापुंजी अशीदेखील ओळख आंबोली हिलस्टेशनची आहे. आंबोली परिसरात आता वर्षभरात तिन्ही हंगामात निसर्ग पर्यटन, वन्यजीव पर्यटन, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन व इतर विविध पर्यटनाचा आनंद घेता येतो. येथील मुख्य 8 स्थळांसह सुमारे 40 पेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळांना भेट देता येते. आंबोली परिसर हा जैवविविधतेने नटलेला असल्याने येथे दुर्मीळ व अतिदुर्मीळ वनस्पती, वन्यजीव, जलचर आदी सजीव सृष्टीचे दर्शन घडते.
जागतिक वारसास्थळ असलेल्या सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील आंबोली थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून साधारणत: 690 मीटर उंचीवर वसलेले आंबोली हिरव्यागार दर्या, डोंगर, वनौषधी व डेरेदार वृक्षांच्या जंगलाने समृद्ध आहे. आंबोली घाटालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. शेकडो वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी गोवा आणि वेंगुर्ले बंदरातून बेळगाव (कर्नाटक) कडे माल वाहतूक करण्याच्या हेतूने आंबोली घाटमार्ग बांधला. तो आजही कार्यरत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा यांना एकत्रित जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग अशीही ओळख आंबोली घाटाची आहे.
आंबोलीत तिन्ही ऋतूंत निसर्गाची किमया पाहायला मिळते. घाटातील आंबोली मुख्य धबधबा आहे. तो पावसाळ्यात पूर्ण प्रवाहित होतो. उन्हाळ्यातही पाणी असो - नसो, पर्यटकांना हा धबधबा आकर्षित करतो. महादेवगड पॉईंटवरून संपूर्ण आंबोली घाट, दर्या आणि जंगल पाहता येते. येथेही क्षणाक्षणाला धुके, मेघ खाली उतरलेले दिसतात. सनसेट (सूर्यास्त दर्शन) पॉईर्ंटस्, शिरगावकर पॉईंट, नांगरतास धबधबा (बारमाही), राघवेश्वर स्वयंभू गणपती मंदिर (हिरण्यकेशी नदीतील), चौकुळ - कुंभवडेतील रोमांच भरवणारा बाबा धबधबा आदी प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे खूप थंडी असते. थंडीच्या दिवसांत साधारणत: 22 ते 25 अंश दिवसा, तर रात्री 7 अंशांपर्यंत तापमान खाली येते. उन्हाळ्यात दिवसा 25 ते 30 अंश व रात्री 15 अंश से. पर्यंत तापमान अनुभवता येते.
आंबोली धबधबा : 5 कि.मी.
सनसेट पॉईंट : 1 कि.मी.
महादेवगड पॉईंट : 2.5 कि.मी.
शिरगावकर पॉईंट : 3.5 कि.मी.
हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र : 3 कि.मी.
स्वयंभू श्री गणेश मंदिर : 1.5 कि.मी.
आंबोली डॅम : 8 कि.मी.
कावळेसाद पॉईंट : 12 कि.मी.
नांगरतास धबधबा : 12 कि.मी.
1000 हून अधिक वनौषधी
28 प्रकारचे प्राणी
450 हून अधिक पक्षी
410 पेक्षा जास्त फुलपाखरे
30 हून अधिक साप
36 प्रकारचे बेडूक
मुंबई/पुणे येथून बंगळूर महामार्गाने कोल्हापूर, उत्तूर, आजरा व आंबोली (480 कि.मी.), तर मुंबई-गोवा हायवेने सावंतवाडी व आंबोली (550 कि.मी.) असे पोहोचता येते. पुणे ते आंबोली 345 कि.मी., कोल्हापूर ते आंबोली 110 कि.मी., गोवा 80 (पणजी), मालवण 70 कि.मी., सावंतवाडी 30 कि.मी. (शहर)
रेल्वे प्रवास : जवळचे रेल्वेस्थानक सावंतवाडी रोड (38 कि.मी.), कुडाळ
विमानतळ : मोपा (50 कि.मी. गोवा), चिपी (75 कि.मी., सिंधुदुर्ग), बेळगाव (70 कि.मी.)