Ganpati Toll Free Complaints  Pudhari
ठाणे

Ganpati Toll Free Complaint: टोलमुक्ती झाली पण फास्टटॅगमधून पैसे कापले, कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा संताप

टोलपास दाखवल्यानंतरही टोलनाक्यावर प्रकार; कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

Ganpati Toll Free Complaint Konkan

ठाणे : राज्य सरकारने कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी टोलमुक्तीची घोषणा केली. त्यानुसार शनिवारी अनेक गणेशभक्त हे टोलपास घेऊन गणेशोत्सवासाठी निघाले खरे, मात्र टोलमुक्तीचा आनंद काही त्यांना घेताच आला नाही. टोलपास दाखवल्यानंतरही अनेकांचे पैसे फास्टटॅगमधून कापले गेल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर फास्टटॅग काढून ठेवल्यानंतरही त्यांच्या खिशाला नाहक कात्री बसल्याचे दिसून आले.

राज्य सरकारने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली. गणेशोत्सव- दरम्यान कोकणात जाणार्‍या भाविकांना राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 66) तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांवरील टोल नाक्यांवर भाविकांना शुल्क भरावा लागणार नाही.

या निणर्यामुळे कोकणात जाणार्‍या खाजगी वाहनधारकांसह एस.टी. महामंडळाच्या बसना मोठा दिलासा मिळणार आहे. टोल माफीसाठी खास गणेशोत्सव 2025, कोकण दर्शन असे पास जारी करण्यात सुरवात झाली आहे. या पासवर वाहन क्रमांक व मालकाचे नाव यांसह प्रवासाचा तपशील नमूद करून ते वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध करून दिले जात आहेत. शासनाच्या आदेशानुसार हे पास ये-जा दोन्ही प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

त्यानुसार शनिवारपासून कोकणात जाणार्‍या भक्तांची लगबग सुरु झाली. ठाण्यातील शेकडो भक्त सकाळ पासूनच कोकणात जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांनी टोलमुक्त पासही सोबत घेतला होता. परंतु टोलनाक्यावर पोहचल्यानंतर टोलपास दाखविल्यानंतरही फास्टटॅगमधून टोलचे पैस कट झाल्याची माहिती समोर आली आहे.

काहींनी तर फास्टटॅग काढून ठेवला होता. तरी देखील त्यांना टोल भरल्याचा मॅसेज आला. त्यामुळे हा टोलमुक्ती पास नावालाच दिला का? अशी भावना भक्तांनी व्यक्त केली आहे. आम्ही नियमानुसार टोलमुक्त पास घेतला. टोलनाक्यावर तो दाखवलासुध्दा मात्र तरी देखील फास्टटॅगमधून टोलचे पैसे कापले गेले. त्यामुळे टोलमुक्त पास हा नावालाच होता का? असा प्रश्न कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT