टोकावडे: टोकावडे-माळशेज राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास दोन पिकअप वाहनांची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा अपघात करचोंडे फाट्याजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मारुती तुकाराम खापरे, त्यांचा मुलगा अजित मारुती खापरे आणि राम मालु सपाटे हे पिकअपने आळेफाट्याकडे जात होते.
त्यावेळी समोरून येणारी कोंबड्यांची वाहतूक करणारी पिकअप ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत असून, त्यातून दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
माळशेज परिसरातील महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणारे वाहन वेगाने धावत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केला जात आहेत ओव्हरटेक करताना वेगावर नियंत्रण न राहिल्यास अशा वाहनांमुळे अनेक गंभीर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे धोका निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
अपघाताची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्याचे पो.नि.शितलकुमार नाईक तसेच काही पोलीस कर्मचऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा पुढील तपास सुरू असून, नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.