ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांना ज्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जातो, त्या टाक्यांची स्वच्छता सहा-सहा महिन्यांनी होणे अपेक्षित असताना वर्षभर या टाक्यांची स्वच्छता होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
शाळांमध्ये लावण्यात आलेल्या अनेक टाक्यांमध्ये गाळ आणि कचरा असल्याच्या तक्रारी शाळांमधूनच करण्यात आल्या आहेत. याच टाक्यांमधील पाण्याचा वापर विद्यार्थी आणि शिक्षक करत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
ठाणे महापालिकेच्या एकूण 64 शाळा असून या शाळांमध्ये 36 टाक्या बसवण्यात आल्या आहेत. याच टाक्यांमधील पाण्याचा वापर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक करत असून यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या टाक्यांची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठाणे महापालिकेवरच असून सहा महिन्यांनी या टाक्यांची स्वच्छता होणे अपेक्षित आहे.
मात्र गेल्या वर्षभरापासून या टाक्यांची स्वच्छता झालीच नसल्याचे उघड झाले असून स्वतः शाळांनीच याबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्याचे उघड झाले आहे. काही शाळांनी तर पाण्याच्या टाक्यांमध्ये कचरा व गाळ असल्याच्या तक्रारी केल्या असून शिक्षण विभागाने ठाणे महापालिकेला पत्र दिले आहे.
शाळांच्या तक्रारीनंतर आता पालिकेच्या वतीने 36 शाळांच्या स्वच्छतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जमिनीखालील आणि जमिनीवरील टाक्या या प्रस्तावानुसार स्वच्छ करण्यात येणार आहे. या टाक्यांच्या स्वच्छतेसाठी 30 लाख 87 हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती ही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.