ठाणे महानगरपालिका  Pudhari News Network
ठाणे

TMC News | ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा निर्णय ठाकरे घेणार

प्रभागनिहाय 33 निरीक्षकांची नियुक्ती; बैठकीत स्वबळाची चर्चा नाही

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबई महानगर पालिकेची निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढविण्याचे संकेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आज ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय होणार्‍या बैठकीकडे सर्व शिवसैनिकांचे लक्ष लागले होते. मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्यासंबंधी कोणतेही भाष्य न करता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांना समस्यांवर आंदोलने, बूथनिहाय, यादीवर काम करण्याचे निर्देश देत महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्याकरिता प्रभागनिहाय 33 निरीक्षकांकडून अहवाल घेऊन उमेदवार निवडीपासून निवडणुकीची पुढील रणनीती ठरविली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यासह राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेतली.

या बैठकीसाठी जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, संघटक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी उध्दव ठाकरे यांच्यासह सरचिटणीस अनिल देसाई माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, गुरुनाथ खोत यांच्यासह निरीक्षकांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी, असे पदाधिकार्‍यांचे म्हणणे होते. त्यानंतर ठाण्याची बैठक बोलावण्यात आल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्यासंदर्भात ठाण्यातील पदाधिकार्‍यांची काय भूमिका असणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष होते.

लोकसभेनंतर तीन विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे सर्वांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. स्वबळाबाबत पदाधिकार्‍यांना व्यक्तिगत मत न विचारता बुथनिहाय काम करण्यास, सदस्य नोंदणी, लोकांच्या समस्याकरिता आंदोलने, यादीवर काम करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील 33 प्रभागावर निरीक्षक नियुक्त करून ते प्रत्येक प्रभागात जाऊन उमेदवारांची चाचपणी करतील. त्यांच्या अहवाल हा आगामी भूमिका ठरविण्यास महत्वाची भूमिका बजावणार आहे.

या बैठकीबाबत शिवसेनेचे नेते राजन विचारे यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व पदाधिकार्‍यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. आम्ही स्वबळाबाबत कोणतीही भूमिका मांडली नसून ठाणे महापालिका निवडणूक कशी लढवायची याचा सर्व निर्णय ठाकरे घेतली असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT