ठाणे : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि पाणी बचतीसाठी शहरातील सर्व सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिकेने काढले आहेत. ठाण्यात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी सर्व्हिस सेंटर असून या सेंटरच्या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणात गाड्या धुतल्या जातात. (Important news for Thane residents, all vehicle washing service centers closed till June 10, action will be taken against those who violate)
सर्व्हिस सेंटरमुळे लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असून या पाण्याची बचत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश काढले आहे. 10 जून पर्यंत हे सर्व सर्व्हिस सेंटर बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे शहरात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत असून अनेक सोसायट्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी तर ठराविक वेळेतच पाणी येत असल्याने नागरिकांची आणि विशेष करून गृहिणींची चांगलीच अडचण होत आहे. ठाण्यात सर्वच भागात पाणीटंचाई जाणवत असली तरी, विशेष करून घोडबंदर भागात तर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत असून येथे दररोज सकाळ, संध्याकाळ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचे समोर आले आहे. तीव्र स्वरूपात उन्हाळा जाणवत असल्याने एमएमआर रिजनमध्ये सर्व शहरांना पाणी पुरवठा करणार्या धरणांतील पाणीसाठा ही कमी होत आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरांच्या पाणीपुरवठ्यावर होत असून दिवसेंदिवस पाणी टंचाईचे संकट अतिशय गडद झाले आहे. धरणांतील पाणीपातळी अत्यंत खालावल्याने भविष्यात पाणी टंचाई अधिक प्रमाणात जाणवणार असल्याने ठाणे महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात सर्व्हिस सेंटर असून यामध्ये दररोज हजारो दोन, तीन चाकी, चार चाकी वाहने, इतर वाहने धुतली जातात. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून गाड्या धुणे व इतर साफसफाईच्या कामावर पालिकेमार्फत तत्काळ निर्बंध घालण्यात आले आहेत.
आजपासून ठाणे शहरातील वाहने धुण्याची सर्व सर्व्हिस सेंटर तत्काळ बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिकेने काढले आहेत. आजपासून 10 जूनपर्यंत ही सर्व सर्व्हिस सेंटर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने दिली आहे. काही ठिकाणी गाड्या धुण्यास पिण्याचा पाण्याचाही वापर करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आले आहे. आजपासून तत्काळ ही सर्व्हिस सेंटर बंद करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट केले आहे.
शहरातील सर्व सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे महापालिकेने आदेश काढले असून यासंदर्भात सर्वाना परिपत्रक देखील काढण्यात आले आहे. मात्र जे सर्व्हिस सेंटर महापालिकेच्या या आदेशाचे उल्लंघन करतील अशा सर्व्हिस सेंटरवर दंडातमक कारवाई करणार असल्याचा इशारा पालिका प्रशासनाच्या वतीने दिला आहे.