ठाणे : ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बील वुसलीचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्यावर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर, आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9603 नळ जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच, 547 पंप रुम सील करण्यात आले आहेत.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. एकूण बिलांच्या रकमेपैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे.
पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले
पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच, पाणी बिलाचा भरणा न करता, खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच, पाणी बील वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिर वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. तरी, नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बील भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ही योजना 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100 टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच, ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.
नियमित वसुली करण्यासोबतच थकबाकी दारांवर देखील महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा थकबाकीदारांना पालिकेने नोटीस दिली असून वेळेत थकबाकी न भरल्यास कनेक्शन खंडित करण्याचा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.