ठाणे

TMC News : नागरी कामांच्या निपटार्‍यासाठी ठाणे महापालिकेचा 100 दिवसांचा कार्यक्रम

कार्यक्रमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे पालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवांबाबतचे कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणेने कृती कार्यक्रम हाती घ्यावा. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचे काटेकोर आयोजन आणि यशस्वी अमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख यांची आढावा बैठक बुधवारी सायंकाळी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे झाली. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामगिरीबाबतचे सादरीकरण केले.

या आढावा बैठकीच्या आरंभी आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केले. नागरिकांचे जीवन सुखकर करणे (इज ऑफ लिव्हिंग) याला प्राधान्य आहे. आपल्या मुलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर काटेकोर नियोजन करावे. प्रशासन सुसंगत पद्धतीने काम करीत असल्याचे नागरिकांना जाणवले पाहिजे, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात, राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिकेनेही कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यात, नागरी सुविधांच्याबाबतीत कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेचे संकेतस्थळ सुसज्ज करणे. माहिती अधिकाराचा वापर करून नागरिक जी सर्वसामान्यपणे उपलब्ध असलेली माहिती विचारतात ती विभागांनी आधीच पारदर्शकपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवून अनावश्यक गोष्टी काढून टाकाव्यात, यांचा समावेश आहे.

अधिकार्‍यांनी नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवून त्यावेळी शक्यतो फिल्ड व्हिजिट ठेवू नयेत. नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण करावे. तसेच, महापालिका क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. त्यांच्यासाठी आखण्यात आलेल्या धोरणांची अमलबजावणी करावी, असेही या कृती कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वेळेत वसूल करा

मालमत्ता कर आणि पाणी बिल यातून येणारा महसुल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्ट पूर्ती तातडीने व्हावी, असे आयुक्त राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट 857 कोटी रुपये असून आतापर्यंत 576 कोटींची वसुली झाली आहे. तर, पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य 225 कोटी रुपये असून त्यापैकी 80 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT