Son opens fire on father and brother over property controversy in Titwala
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता आणि जमिनीच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची घटना टिटवाळ्यातील गुरवलीपाडा गावात घडली आहे. या गोळीबारात वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार गंभीर जखमी झाले आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कल्याण तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तासातच त्याला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे टिटवाळ्यासह कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश बाळाराम शेलार याचा वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार यांच्याशी मालमत्ता आणि जमिनीच्या कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.
या वादातून कुटुंबात वारंवार तणाव निर्माण होत होता. अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या या वादाचे अखेर गोळीबारात रूपांतर झाले. मंगळवारी रात्री संतापाच्या भरात कल्पेशने आपल्या वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात बाप-लेक दोघेही रक्तबंबाळ होऊन कोसळले.
गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या घरांमधील लोक धावत बाहेर आले. जखमींना तातडीने कल्याणमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यातील एकाच्या पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मालमत्तेच्या वादातून केला हल्ला
संशयित आरोपी कल्पेश शेलार हा पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारमधून घटनास्थळावरून पसार झाला होता. पण कल्याण तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवून काही तासातच त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कल्पेशच्या पत्नीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालमत्तेच्या वादातूनच हा गोळीबार झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेमागील नेमकं कारण काय ? हा वाद नेमका कशावरून पेटला आणि गोळी कुठून आणली गेली ? याचा सखोल तपास पोलीस करत असून तपासानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.