Titwala Police News Pudhari
ठाणे

Titwala Police News: कर्तव्याच्या पलीकडे उभी राहिलेली खाकीतील माणुसकी

टिटवाळा पोलिसांची हृदयस्पर्शी धाव, निराधार महिलेला केली मदत

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा: ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातून माणुसकीचा एक विलक्षण आणि अंतर्मुख करणारा प्रसंग समोर आला आहे. बेवारस अवस्थेत, जीवघेण्या परिस्थितीत सापडलेल्या एका अज्ञात महिलेच्या मदतीसाठी टिटवाळा पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

7 एप्रिल रोजी, सुमारे 30 ते 35 वयोगटातील एक महिला टिटवाळा परिसरात अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. ओळख नाही, नातेवाईकांचा मागमूस नाही, मानसिक संतुलन ढासळलेले अशा परिस्थितीत अनेकजण दुर्लक्ष करतात; पण टिटवाळा पोलिसांनी मात्र “ही आपली जबाबदारी नाही” असे न म्हणता, तिला माणूस म्हणून पाहिले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचारी अविनाश पाटील, अशोक बागुल, गांगुर्डे यांच्या सहकार्याने तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी केवळ औपचारिकता पूर्ण न करता, त्या महिलेच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी स्वीकारत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

यासाठी मुंबईतील चेंबूर येथील ‌‘ग्रेस फाउंडेशन‌’ या संस्थेशी संपर्क साधत अधिकृत पत्राद्वारे मदतीची विनंती करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता, तिच्या उपचाराची आणि पुढील काळजीची जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली हीच खरी संवेदनशीलता.

तपासात उघड झाले की, संबंधित महिला टिटवाळा परिसरातच राहत होती. कोरोना काळात तिने आपल्या नातेवाईकांना गमावले आणि त्यानंतर तिची मानसिक अवस्था ढासळली. अनेक दिवस ती भटक्या अवस्थेत होती. पायाला गंभीर जखम होऊन त्यात जंतूसंसर्ग झाला होता.

तिची ही अवस्था पाहून एपीआय सरला काळे यांना अक्षरशः गहिवरून आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा हात पुढे केला.साधारण 35 वर्षांच्या या महिलेचे नाव नंदिनी शाकियत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोरा वर्ण, सडपातळ बांधा, अंगावर पिवळसर टॉप एवढ्याच ओळखीच्या धाग्यावर तिचा शोध सुरू असताना, तिच्या पाठीशी उभे राहिले ते पोलिस कर्तव्याच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकी जपणारे.

“कोणाचाही आधार नसताना, आम्ही आहोत”

ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नाहीत, तर समाजातील दुर्बल, निराधार घटकांसाठी तेच खरे आधारवड आहेत. “कोणाचाही आधार नसताना, आम्ही आहोत” हा विश्वास देणारी टिटवाळा पोलिसांची ही कृती समाजाच्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना निर्माण करणारी ठरली आहे.आजही काही गणवेश केवळ अधिकाराचे नव्हे, तर जिवंत माणुसकीचे प्रतीक आहेत आणि टिटवाळा पोलिसांनी ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT