छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होऊन रोज जागतेय शिवभक्ती pudhari photo
ठाणे

Thane News : छत्रपती शिवरायांपुढे नतमस्तक होऊन रोज जागतेय शिवभक्ती

टिटवाळ्यातील महिलेची सेवा अंत:करणाला भिडणारी

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : अजय शेलार

शिवजयंती आली की शहर घोषणांनी दुमदुमते, व्यासपीठांवरून शिवचरित्राचा गजर होतो, फिती कापल्या जातात, पुष्पहारांनी पुतळे नटतात आणि सामाजिक माध्यमांवर छायाचित्रांचा वर्षाव होतो; मात्र काही तासांतच तो उत्साह विरतो आणि स्मारक पुन्हा रोजच्या वास्तवात एकटे पडते.

या पार्श्वभूमीवर टिटवाळा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य म्युरलशेजारी घडणारे दृश्य वेगळाच आशय मांडते. येथे शिवरायांना मान केवळ एका दिवसापुरता नाही, तर दररोजच्या कृतीतून दिला जातो. तोही कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना, एका साध्या फळविक्रेत्या महिलेच्या हातून.

सलमा गेली अनेक वर्षे या ठिकाणी फळविक्री करून आपला उदरनिर्वाह करते. तिचा दिवस व्यवहाराने सुरू होत नाही; तो सुरू होतो स्वच्छतेच्या आणि वंदनाच्या साध्या पण अर्थपूर्ण कृतीने. दुकान मांडण्यापूर्वी ती परिसराची झाडलोट करते, पाण्याने जागा धुते, म्युरलभोवती स्वच्छता राखते आणि त्यानंतर हात जोडून शिवरायांना अभिवादन करते. तिची ही सेवा निःशब्द आहे, पण प्रभावी आहे; साधी आहे, पण थेट अंतःकरणाला भिडणारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सर्वसमावेशकतेचा, न्यायनिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा आहे, हा विचार सलमा पुस्तकातील धड्यांमधून नव्हे, तर आपल्या आचरणातून जागवते. ही महिला दररोज छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होते, हा प्रसंग बोलका आहे. तिची श्रद्धा घोषणांपेक्षा मोठी, तिचे मौन भाषणांपेक्षा अधिक अर्थपूर्ण ठरते.

या घटनेतून एक अस्वस्थ करणारे वास्तवही समोर येते. स्मारके उभारली जातात, उद्घाटने थाटात होतात, राजकीय उपस्थिती लावली जाते; पण त्यानंतर देखभाल, जतन आणि सातत्यपूर्ण जबाबदारी या बाबी दुय्यम ठरतात. केवळ उत्सवापुरती उपस्थिती लावणाऱ्यांसाठी तिची रोजची सेवा ही खऱ्या अर्थाने पारदर्शक ठरते. खरी सामाजिक बांधिलकी ठरते.

टिटवाळ्यातील ही कथा केवळ एका म्युरलपुरती मर्यादित नाही; तर ती समाजाच्या विवेकाला स्पर्श करणारी आहे. एका निराधार महिलेची रोजची झाडलोट ही सामाजिक ऐक्याची आणि खरी शिवभक्ती काय असते याची जिवंत साक्ष ठरते. कोणत्याही उत्सवाच्या रोषणाईपेक्षा सातत्याने जपलेली श्रद्धा ही अधिक तेजस्वी असते, हे टिटवाळ्यातील या अभूतपूर्व श्रद्धेतून अधोरेखित झाले आहे.

मनातील शिवरायांचे स्थान अढळ...

फळविक्री करून कसाबसा उदरनिर्वाह करणारी ही महिला स्वतः निराधार आहे. अलीकडेच तिच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने तिला रोजची कामे करतानाही त्रास सहन करावा लागतो; सकाळची झाडलोट, पाणी आणणे, दुकान मांडणे, प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी आता अधिक कष्टाची झाली आहे. तरीही तिच्या मनातील शिवरायांविषयीचा मान आणि नित्यनेमाची पूजा आजही तितक्याच अढळपणे सुरू आहे. अडचणींवर मात करत ती रोज प्रथम वंदन करते आणि मगच आपल्या जगण्याची लढाई सुरू करते. यातूनच तिच्या भक्तीची खरी उंची अधोरेखित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT