टिटवाळा : टिटवाळा पश्चिम परिसरातील ओमकार वसाहत, मांडा व आसपासच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या पाण्याने नागरिक अक्षरशः संतप्त झाले आहेत. नळांमधून हिरवट, कचरा मिसळलेले, विचित्र वास येणारे, पूर्णपणे अशुद्ध पाणी वाहू लागल्याने संपूर्ण वस्तीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता असे दूषित पाणी थेट वापरासाठी सोडल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
नळातून थेट ‘काळेकुट्ट पाणी’ येत असून पाणीपुरवठा सुरू होताच नागरिकांनी टब, बादल्या आणि दैनंदिन वापरातील भांड्यांमध्ये आलेल्या पाण्याचे व्हीडिओ व फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केले.
पाणी इतके मळकट व दुर्गंधीयुक्त की, पाणी पिण्यायोग्य सोडा, पण ते हात धुण्यासाठीही अयोग्य असल्याने हे पाणी शरीराला लागले तरीही आजार होईल,” अशी भीती अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“आजारी पडल्यास जबाबदार कोण?”
“महापालिकाआमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष कसे करू शकते? शुद्धीकरणाची चाचणी न करता असे पाणी कसे सोडले?” असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. दूषित पाण्यातून टायफॉइड, हिपॅटायटिस-ए, उदरविकार, अतिसार यांसारखे जलजन्य रोग झपाट्याने पसरू शकतात.पावसाळ्याचा हंगाम नुकताच संपला असताना अशा दूषित पाणीपुरवठ्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण परिसरात आरोग्यसंकट निर्माण होऊ शकते, असा वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
आम्हाला दूषित पाणी नको!
पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पारदर्शक करावी मेटेनन्सदरम्यान पूर्वसूचना द्यावी तसेच पाणी नमुने तपासूनच पुरवठा करावा येथील रहिवाशी लीलाधर भावीस्कर यांनी प्रशासनाकडे तक्रार देत, “नळांतून येणारे पाणी हे नागरिकांचे आरोग्य ठरवते. अशा बेफिकिरीला माफ केले जाणार नाही,” असे सांगितले. तर परिसरात “सुरक्षित, स्वच्छ पाणी हा आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्हाला दूषित पाणी नको आमच्या आरोग्याशी खेळ थांबवा!” असा एकमुखी सूर संपूर्ण वस्तीमधून उमटताना दिसत आहे.