Jari Mari Mata Temple Pudhari
ठाणे

Jari Mari Mata Temple: कल्याणच्या तिसगावची जरी-मरी माता; तलावातून प्रकट झालेल्या देवीचा रंजक इतिहास

स्वयंभू आदिशक्ती जरी-मरी मातेचे दोनशे वर्षांहून जुने श्रद्धास्थान; १९५६ आणि १९९०-९१ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार

पुढारी वृत्तसेवा

योगेश गोडे

ठराशेच्या शतकात कल्याण शहरातील छोटेसे खेडे असणाऱ्या तिसगावात स्वयंभू आदिमाया जारी-मरी माता प्रगट झाली. बातमी वाऱ्यासारखी चहूदिशेला पसरली. गाव-खेड्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून आदिशक्तीच्या दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी वाढू लागली. स्वयंभू आदिशक्ती नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती भक्तांच्या मनामनात कोरली गेली. या आदिमाया शक्तीचा इतिहास हा मोठा रोमांचक आहे.

तिसगावची माता जरी मरी आई हे स्वयंभू कल्याणातील देवस्थान आहे. खेड्यात ग्रामस्थ करत सकाळ-संध्याकाळ गुरे चरावयास नेण्‍याचे काम करत असत. नेहमीप्रमाणे गुराख्यांनी गुरे चरण्यासाठी तिसगाव शेजारील कातेमनिवली डोंगरीवर नेली असता अचानक वादळ सुटले व गणा गायकवाड नावाच्या गुरख्याच्या कानात आकाशवाणी सदृश्य भास झाला, मी आपल्या गावांजवळील तलावात मध्यभागी पाषाण स्वरूपात आहे.

मला वर काढ आणि माझी स्थापना कर! घाबरलेल्या गणाने घडलेला प्रकार सवंगडयांना सांगितला. सवंगड्यांनी गावांत जाऊन घडलेली घटना पंच प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली. यावर गावकऱ्यांनी बैठक घेऊन गणाच्या म्हणण्यानुसार तलावात शोध घेण्यास काहीच हरकत नाही असे ठरले. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थ तलावात देवीचा शोधासाठी उतरले.

मात्र काही हाती लागले नाही. प्रसंगी गणाच्या डोळ्यासमोर तलावातील देवीची मूर्ती दिसत होती. झोपेत चालणाऱ्या माणसांप्रमाणे गणा चालत होता व त्याने तलावात बुडी मारली आणि गणा पाण्यातून वर आला तो देवीची मूर्ती घेऊनच.

मूर्ती पाहून सर्वच ग्रामस्थांना आश्चर्य वाटले. ग्रामस्थांच्या तोंडून उस्फूर्तपणे देवीच्या नावाचा जय-जयकार सुरू झाला. देवादिकही ज्या आदिमाया शक्ती अंबा मातेला शरण जाऊन आपली अडचण सोडवितात अशी ही आदिमाया शक्ती जरी-मरी मातेच्या रूपाने तिसगांवात तलावांतून प्रगट झाली.

आदिशक्तीच्या पूजेचा मान कोणाला द्यायचा म्हणून पुन्हा ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत गणा यांना पुन्हा आवाज ऐकू आला. की माझी पूजा तूच करावी. पुन्हा एकदा गणा गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत आदिशक्ती मातेने माझी पूजा तूच करावी असे सांगितले.

हे गणाचे शब्द ऐकून अनेकांनी गणा खोट बोलत आहे. देवी त्यालाच साक्षात्कार कसा देते. म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवला. त्यानंतर पंच ग्रामस्थांनी एक शक्कल लढवत गणाला पंचांनी मनात ठरवलेल्या पाच रंगांपैकी एक रंगाचे फूल ओळखून दाखवला तर खरंच देवीचा साक्षात्कार झाल्याचे मान्य करू! असे म्हणताच गणाने क्षणाचाही विलंब न करता पाच पंचांनी मनात ठरवलेलं फूल तत्काळ ओळखून दाखवलं. त्याच वेळेस चमत्कार घडला आणि

तलावासमोर असणाऱ्या मंदिरात कुलुपच्या आत गणा धावत सुटला. कुलुपच्या चावी पंचांकडे मग गणा आत कसा गेला? याचा उलगडा आजही कोणालाच झालेला नाही. मग गावकऱ्यांनी विचार करून एका शुभदिनी देवीची तलावसमोर असणाऱ्या झोपडी वजा मंदिरात स्थापना केली. त्या दिवसापासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिद्धीस आला. ही बातमी वाऱ्यासारखी

पंचक्रोशीतील समजल्यावर तिसगांवमध्ये लांबून लांबून लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे तिसगांवमध्ये मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले. हळूहळू जरीमरी देवस्थानाचा महिमा सर्वत्र पसरू लागला.

आदिशक्ती जरीमरी मातेचे जयजयकार महाराष्ट्रातच नव्हे देशभरात गुंजू लागला. तर बाहेरील इतर राज्यातूनही सर्व भाविक देवीचे दर्शनासाठी तिसगांवात येऊ लागले. भक्तिभावाने आपली गाऱ्हाणी देवीला सांगू लागले. देवीही नवसाला पावू लागली. तिसाची आई जरीमरी माता नवसाला पावणारी व संकटकाळी धावून येणारी भक्तांचे श्रद्धास्थान बनली.

भव्‍यदिव्‍य मंदिर उभारणी...

अठराशेच्या दशकात तिसागवत स्वयंभू आदिशक्ती प्रगट झाली. दोनशे वर्षांपूर्वीपासून इतिहास असणाऱ्या आदिशक्ती तिसाई जारीमरी मातेची स्थापन एक झोपडीवजा मंदिरात करण्यात आली होती. यानंतर बापूसाहेब ओक यांच्या अध्यक्षतेखाली मंदिराचा जीर्णोद्धार १९५६ साली करण्यात आला. त्यानंतर १९९०-९१ साली जरी-मरी सेवा मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा तिसऱ्यांदा आजचे स्वरूप असणाऱ्या भव्य मंदिर वास्तूचा जीर्णोद्धार करण्यात आला.

मात्र अजून भव्यदिव्य मंदिराचा जीर्णोद्धार येणाऱ्या काळात होणार असल्याचे देखील अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सांगितले. तर ग्रामस्थांच्या वर्गणीतूनच आदिशक्ती जरीमतेचे अजून भव्यदिव्य मंदिर उभारणार असल्याचे आ. सुलभा गणपत गायकवाड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT