भिवंडी : शिक्षक पात्रता परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना बिहार-पाटणा येथून ताब्यात घेतले. त्यामुळे आरोपींची एकूण संख्या आता सातवर गेली आहे. प्रत्यक्ष पेपर घेऊन आलेल्या तिघांना अटक झाली होती. त्यानंतर मुख्य आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी गुप्ता हिला अटक झाली होती. तर, आता कपिल दहियासह तिघांना अटक झाली. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असता, ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात गुरुवारी पोलिस यंत्रणेला यश आलेे. या प्रकरणात यापूर्वी एका महिलेसह चारजणांना अटक केल्यानंतर गुरुवारी समस्तिपूर येथून दोन, तर सोनिपत-हरियाणा येथून एक अशा तीन आरोपींना अटक करून भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे.
सोनुकुमार सिंह (वय ३३), मिथुनकुमार सिंह (३४, दोघेही रा. समस्तिपूर, बिहार) व कपिल कृष्णा दहिया (४१, रा. सोनिपत, हरियाणा) अशी गुरुवारी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
चारही आरोपींची एसआयटी चौकशी सुरू
या प्रकरणाच्या चौकशीसाठी भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालयात एसआयटी पथकाचे प्रमुख पंजाबराव उगले हे दाखल झाले होते. यापूर्वी अटक केलेले धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाशकुमार स्वराजकुमार व सुमनकुमारी गुप्ता या चारही आरोपींना चौकशीसाठी गुरुवारी पोलिस उपायुक्त कार्यालयात घेऊन आले होते. त्यांची उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
टीईटी परीक्षा आयबीपीएसकडे
भिवंडीतील पेपरफुटीच्या घटनेमुळे रद्द करून पुढे ढकलण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चे आयोजन आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेमार्फत करण्याचा प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेकडून पुढे आला आहे. परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.