ठाणे : देशातील संवेदनशील भागाची माहिती एका पाकिस्तानी महिलेला पुरवणाऱ्या कळव्यातील एका संशयित इसमासह त्याच्या दोन साथीदारांना महाराष्ट्र एटीएस पथकाने गुरुवारी ठाण्यातून अटक केली. फेसबुकच्या माध्यमातून नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत हा व्यक्ती पाकिस्तानमधील एका महिला इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सोबत संपर्कात होता व त्याने व्हाट्सएपवरून अनेक ठिकाणांची माहिती व फोटो पाकिस्तानात पाठवल्याचे एटीएसच्या तपासातून समोर येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतात राहून पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या गद्दारांची पाळेमुळे शोधण्यास तपास यंत्रणांनी सुरवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तान व दहशतवादी संघटनांशी संबंधित संशयितांची देशभरात धरपकड सुरू झाली आहे. दरम्यान, कळव्यातील एक व्यक्ती पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात आहे अशी माहिती राज्य एटीएस पथकास मिळाली होती. त्यानंतर एटीएस पथकाने गुरुवारी कळव्यातून 35 वर्षीय इसमास अटक केली. तसेच या व्यक्तीला मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांना देखील एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे.