Ulhas River Pollution Pudhari
ठाणे

Badlapur Fish Death | बदलापूर येथे उल्हास नदीत विषारी पाण्याने हजारो माशांचा मृत्यू

जांभूळ परिसरात पाण्यावर तरंगले मृत मासे, एक कोटी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यावर संकट

पुढारी वृत्तसेवा

Ulhas River Pollution

डोंबिवली: उल्हास नदी सद्या जणू विषारी मृत्यूच्या छायेखाली सापडली आहे. कारण बदलापूर जवळील जांभूळ परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांत अचानक हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले आणि तो भयानक नजारा पाहून संपूर्ण नदीकाठ हादरून गेला आहे. सकाळी मासेमारीसाठी नदीवर गेलेल्या स्थानिक मच्छिमारांना नदीचे पाणी नेहमीसारखे न दिसता वेगळ्याच रंगाचे आणि दुर्गंधी येणारे दिसले आणि पाण्यावर तरंगणारे हजारो मृत मासे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

कर्जत पासून निघणारी आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली मार्गे ठाण्यापर्यंत वाहणारी ही उल्हास नदी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिकांमधील जवळपास एक कोटी नागरिकांची जीवनवाहिनी आहे. याच नदीचे पाणी जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात उचलून प्रक्रिया करून लाखो घरांमध्ये पिण्यासाठी पाठवले जाते. पण ज्या जांभूळ परिसरात हे मासे मरून पडले आहेत त्याच ठिकाणाहून पाणी उचलले जात असल्याने आता लाखो नागरिकांच्या आरोग्यावर थेट घाला घातला गेला आहे का ? असा संतप्त सवाल सर्वत्र विचारला जात आहे.

औद्योगिक वसाहतींमधून रात्रीच्या अंधारात सोडले जाणारे रासायनिक आणि विषारी पाणी हेच या सामूहिक माशांच्या मृत्यूमागचे खरे कारण असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कारण त्या विषारी पाण्यामुळे नदीतील विरघळलेला ऑक्सिजन म्हणजेच डिसॉल्व्हड ऑक्सिजन कमालीचा खाली गेला आहे. ऑक्सिजनशिवाय गुदमरून हजारो माशांनी जीव सोडला आहे. एका वैज्ञानिक अभ्यासानुसार या नदीच्या गोड्या पाण्याच्या प्रवाहात तब्बल ५९ प्रजातींचे मासे आढळतात. पण आता हीच समृद्ध जैवविविधता नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि नदीत झपाट्याने वाढणारी जलपर्णी तर नदीचा श्वासच रोखत चालली आहे.

नदीकाठच्या आदिवासी आणि स्थानिक कुटुंबांचा उदरनिर्वाह पूर्णपणे मासेमारीवरच अवलंबून आहे. रोज नदीवर जाऊन मासे पकडून त्यावर घर/प्रपंच चालवणाऱ्या या कुटुंबांवर आता अचानक आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांची रोजची भाकरीच हिरावली गेली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे धाव घेत पाण्याचे नमुने तपासून दोषी कंपन्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दोषी कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन करताना सांगितले आहे की नदीकाठावरील मृत मासे अजिबात उचलू नका, ते खाऊ नका आणि बाजारात विकूही नका. कारण ते विषारी असू शकतात आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतो. तसेच नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळूनच प्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. आता प्रश्न एकच उरला आहे की एक कोटी लोकांची तहान भागवणाऱ्या या जीवनदायिनी नदीला विषारी करणाऱ्या दोषी कंपन्यांवर प्रशासन कधी कारवाई करणार आणि उल्हास नदी पुन्हा कधी स्वच्छ आणि जिवंत होणार का? याकडे आता संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT