ठाणे : विधानसभेत महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. त्यामुळे मद्य व क्लबमधील पार्ट्या अन् काही वस्तूंवरील व्हॅट वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या 31 डिसेंबरची पार्टी महागणार आहे. असे असले तरी महागाईची ऐसी तैसी करत मद्यप्रेमींकडून नववर्ष साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नववर्षाचे स्वागत करण्याचा उत्साह प्रत्येक ठिकाणी शिगेला पोहोचतो. तसाच उत्साह यंदा देखील दिसून येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स आतापासूनच सज्ज होऊ लागले असून ऐनवेळी गैरसोय टाळण्यासाठी अनेक हॉटेलांनी आतापासूनच टेबल बुकिंग सुरू केले आहे. ठाण्यातील येऊर, घोडबंदर रोड, कल्याण शीळ फाटासह शहरातील सर्वच बार, हॉटेल व धाब्यांवर थर्टी फर्स्टची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे. यंदा नववर्षावर महागाईचे सावट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत देशी -विदेशी मद्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर चिकन व मटनच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मद्य विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवली आहे.
त्यात थर्टीफस्टच्या एका रात्रीत तब्बल 70 ते 90 लाख लिटर बियरची विक्री होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागील वर्षी शेवटच्या आठवड्यात 70 लाख लीटर बियर, 28.32 लाख लीटर विदेशी तर 31 लाख लीटर देशी मद्याची विक्री झाली होती. यंदा मद्य विक्रीत वाढ होईल, अशी माहिती मद्य विक्रेता यांनी दिली. मद्याच्या किमतीत वाढ झाल्याने मद्याचे पेले रिचवताना यंदा खिसा चांगलाच खाली होणार आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जाण्याऐवजी पार्सल घेऊन जाणार्यांची संख्या यंदा जास्त असल्याचे एका बारमालकाने सांगितले. मासे व मटणाचे दर आधीच भरमसाट वाढल्याने खास नववर्षासाठी किमती वाढवल्या नसल्याचे सांगण्यात आले. तसेच गेल्या काही वर्षात आगरी पद्धतीचे जेवण देणार्या खाणावळी व ढाब्यांची चलती आहे. डोंबिवलीतील शिळ रोडवर अशा ढाब्यांवर चविष्ट जेवणासाठी येणार्यांची संख्या बरीच वाढणार आहे.
नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील चिकन, मटण व्यापार्यांनी मोठी तयारी केली असून, चिकन, मटण आणि माशांची ऑर्डर आधीच बुक होऊ लागल्याचे व्यापार्यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून मांसविक्रीत फारशी तेजी नसल्याने किमान नववर्षाला तरी चांगली मागणी येईल, अशी विक्रेत्यांना अपेक्षा आहे. थर्टीफस्टच्या दिवशी सर्वाधिक मागणी चिकनला असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. मटणाचाही चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी मागील आठवड्यापासूनच बोकड खरेदी करून ठेवले आहेत. थर्टीफस्टच्या दिवशी 12 ते 15 टनांपर्यंत मटणविक्री होण्याचा अंदाज आहे. चिकन, मटणाच्या बरोबरीला नववर्षाला माशांनाही बर्याच प्रमाणात मागणी असते. साधारणतः या दिवसांत माशांची विक्री चांगली होते. बाजारात तब्बल डझनभर प्रकारचे मासे विक्रीला आलेले आहेत. तसेच न्यू इयर सेलब्रेशनमध्ये बिर्याणीची मोठी महत्वाची भूमिका असते. अनेकजण न्यू इयरला बिर्याणी पार्टीचा बेत आखतात. त्यामुळे राबोडी आणि तळोजातील बिर्याणीला प्रचंड मागणी असते. यंदा मात्र बिर्याणी महागली आहे.
नववर्ष स्वागताच्या निमित्ताने थर्टी फस्टच्या रात्री अनेक ठिकाणी करमणूक कार्यक्रम तसेच मेजवान्यांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये ओल्या पार्ट्या रंगतात. अशा पार्ट्यांना हजेरी लावणारे तळीराम दारूच्या नशेत गाडी चालवून अपघातांस कारणीभूत ठरतात. त्यामुळे नशेत वाहन चालवणार्यांच्या जीवावरही बेतू शकते. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. थर्टी फर्स्टच्या रात्री मद्याच्या पार्ट्या झोडणार्यांनी घरी परतण्यासाठी स्वत: वाहन चालवू नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये मद्य पुरविणार्या हॉटेल व बार व्यावसायिकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. पार्टी आयोजित करताना निमंत्रितांना अथवा त्यात सहभागी होणार्या मद्यपि वाहनचालकांना घरी पोहोचवण्यासाठी वाहनचालकांची व्यवस्था करा, अन्यथा मद्यविक्रीची परवानगी नाकरण्यात येईल, अशी तंबीच पोलिसांनी बार व हॉटेल मालकांना नोटीसीद्वारे दिली आहे. पोलिसांच्या या तंबीनंतर हॉटेल व बारमालकांनी देखील कायद्याची चौकट राखून पिऊन टल्ली होणार्या ग्राहकांसाठी घरपोहोच वाहनांची व्यवस्था केली आहे.