ठाणे : डिसेंबर मावळतीला लागला की मद्यप्रेमींना चाहूल लागते ती 31 डिसेंबरची. मद्य सेवन करत 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करत नवीन वर्षाचे स्वागत अनेकांना कारायचे असते. पण यंदा मात्र हॉटेल असोसिएशनने आगळावेगळा पुढाकार घेत दारू प्या, पण चार पेगपेक्षा जास्त नको, असे आवाहन केले आहे.
मद्यपान केलेल्या लोकांसाठी भाड्याने ड्रायव्हर देण्याची देखील योजना हॉटेल असोसिएशनने केली आहे. यंदाही 31 डिसेंबरच्या रात्री पहाटे 5 पर्यंत हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे सचिव प्रदीप शेट्टी यांनी 'पुढारी'ला सांगितले की, 31 डिसेंबरच्या रात्री ग्राहकांनी चार पेग प्यायल्यानंतर त्यांना चढली असे वाटल्यास सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल मालकांना देण्यात आल्या आहेत.
अनेक हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना देखील दारू दिली जात असल्याची प्रकरणे समोर येत असतात. त्यामुळे मुंबईतील सर्वच हॉटेलमध्ये वयाची पडताळणी अनिवार्य केली आहे. थर्टी फर्स्टला पार्टीला जाताना ग्राहकांना ओळखपत्र सोबत ठेवणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.