नेवाळी (ठाणे) : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी कोकण सागरी किनारपट्टीवर पुन्हा संघर्षाची हाक देण्यात आली आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील गावागावांच्या वेशींवर यासंदर्भातील अल्टिमेटम सरकारला देण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत दिलेला शब्द लक्षात घेता भूमिपुत्रांनी सरकारला काही दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र आता निवडणुकांचा कालखंड जवळ येत असल्याने भाजपाला विमानतळाच्या नामकरण प्रश्नी कोंडीत पकडण्यासाठी भूमिपूत्र नवीन संघर्ष उभा करत आहेत. गावागावांच्या वेशींवर झळकत असलेले होर्डिंग्स चर्चेत आले असल्याचे चित्र सागरी किनारपट्टीवरील गावांमध्ये दिसुन येत आहेत.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी मोठा संघर्ष केला होता. यासाठी अनेक लक्षवेधी आंदोलन करून राज्यासह केंद्राचे देखील भूमिपुत्रांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवत असल्याची घोषणा केली होती. नामांतराचा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठविण्यात आला असून त्यानंतर मोठा कालखंड लोटला आहे. नुकत्याच झालेल्या नवी मुंबई विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान दि. बा. पाटील यांचे नाव घोषित करतील अशी अपेक्षा भूमिपुत्रांना होती. मात्र प्रत्यक्षात तसे न झाल्याने आता भूमिपुत्रांनी पुन्हा सरकारविरोधात संघर्ष करण्यास सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ३ ओक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि बा पाटील नामकरण होईल त्याला ६० दिवसांचा कालावधी लागेल असे आश्वासन दिले असून ८ तारखेच्या विमानतळ उद्घाटन सोहळ्यात मोदीजी आणि फडणवीसांनी ह्या बद्दल ब्र देखील उच्चारला नाही. त्यामुळे भूमिपुत्रांचा भ्रमनिरास झाला आहे याच आक्रोशातून आता आम्ही गावोगावी आमचे 'लोकनेते दि बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' आज पासून भूमिपुत्रांचा सरकारसाठी काऊंटडाऊन सुरु अशे फलक गावकी मार्फत लावत आहोत. यातून एकच इशारा द्यायचा आहे आम्ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र एक आहोत जर आम्हाला फसविण्याचा सरकारने प्रयत्न केला तर इकडील भूमिपुत्र येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जागा दाखवणार.सर्वेश रविंद्र तरे, आगरी साहित्यिक
मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करणार का?
गावोगावच्या वेशीवर झळकवलेले होर्डिंग्स चर्चेत आले असून यामधून आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भूमिपुत्रांनी सुरु केला आहे. त्यामुळे आता भूमिपुत्रांच्या या सुरू झालेल्या पुन्हा नव्या संघर्षाआधी केंद्र सरकार नामांतरणाचा प्रश्न मार्गी लावतंय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली सह भिवंडी, बदलापूर परिसरात झळकलेले होर्डिंग्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे आता भूमिपुत्रांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.