डोंबिवली : डोंबिवलीत ऑनलाईन गेमचा नाद ३० वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. या तरूणाने गेमच्या व्यसनामुळे वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. वित्तीय संस्थांनी दिलेले कर्ज या तरूणाला फेडता आले नाही. संस्थांनी वसूलीसाठी तगादा लावल्यामुळे या तरूणाने विषारी किटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरूवारी (दि.३०) डोंबिवलीतील देसले पाड्यात घडली.
मोहित त्रिवेंद्र पुन्दीर (वय ३०) असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेची माहिती मुंब्य्रात राहणाऱ्या फैजान शेख नावाच्या तरूणाने मानपाडा पोलिस ठाण्यात दिली. या माहितीनुसार पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मोहित पुन्दीर याला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या गेमच्या नादात त्याने अनेक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. अनेक संस्थांकडून घेतलेले कर्ज मोहित ठरलेल्या वेळेत फेडू शकत नव्हता. देणेकरी संस्थांनी वसूलीसाठी मोहितच्या मागे तगादा लावला. कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने एवढी रक्कम आपण उभी करायची कशी ? या नैराश्येतून मोहितने गुरूवारी राहत्या घरी विषारी किटकनाशक प्राशन केले. त्याला उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.